मुंबई : आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे तूर्तास जमिनीवरच स्थिरावलेल्या गो-फर्स्ट विमान कंपनीचे २०० वैमानिकएअर इंडिया कंपनीत रुजू झाल्याचे वृत्त आहे. यापैकी ७५ वैमानिकांचे क्लासरूम प्रशिक्षणदेखील सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर गो-फर्स्ट कंपनी पुन्हा सुरू झाली तर त्यांना वैमानिकांची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २ मेपासून गो-फर्स्ट कंपनीची सेवा स्थगित झाली आहे. आता तर कंपनीची सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित झाली आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्येदेखील विलंब झाल्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी अन्य विमान कंपन्यांकडे मोर्चा वळविला आहे.
यामध्ये वैमानिकांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. अलीकडेच एअर इंडिया कंपनीने वैमानिकांसाठी घेतलेल्या वॉक इन मुलाखतीमध्ये गो-फर्स्टच्या अनेक वैमानिकांनी हजेरी लावली होती. त्यातूनच अनेक जणांची निवड झाल्याचे समजते. कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी गो-फर्स्टने नुकतेच नवीन पॅकेज जाहीर केले असून वैमानिकांना त्यांच्या महिन्याच्या पगाराखेरीज प्रति महिना १ लाख रुपये तर को-पायलटला ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीच्या भविष्याबद्दल अस्थिरतेचे वातावरण कायम असल्याने अनेक कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात आहेत.
हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी
- भारतीय विमान क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या असून गो-फर्स्टमुळे अन्य विमान कंपन्यांना आणखी संधी मिळाली आहे.
- उपलब्ध माहितीनुसार, २०२४ मध्ये इंडिगो कंपनीला आणखी ५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर अकासा एअर कंपनी आणखी एक हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत आहे. एअर इंडिया कंपनीला देखील ९०० नवे वैमानिक यावर्षी हवे असून ४,२०० केबिन कर्मचारी हवे आहेत.