झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. सोनीसोबतचा विलीनीकरणाचा करार मोडल्याच्या धक्क्यातून कंपनी अजून सावरली नव्हती की बाजार नियामक सेबीनं त्यांची चिंता वाढवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेबीला (SEBI) झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या खात्यातून २४ कोटी डॉलर्स १९,८९,२८,४४,००० रुपये मिसिंग असल्याचं आढळलं आहे. सेबीच्या तपासात असं समोर आलंय आहे की कंपनीकडून सुमारे २४.१ कोटी डॉलर्स वळवण्यात आले आहेत.
सेबीच्या तपास अधिकाऱ्यांनी सुरुवातीला जो अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा ही रक्कम जवळपास दहापट अधिक आहे. यासंदर्भात सेबीनं कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. यामध्ये कंपनीचे संस्थापक सुभाष चंद्रा आणि त्यांचा मुलगा पुनित गोयंका यांचा समावेश आहे. याप्रकरणी बोर्डाच्या काही सदस्यांकडून खुलासाही मागवण्यात आलाय.
झीच्या प्रवक्त्यानं कंपनी सेबीला सर्व माहिती देण्याच्या प्रक्रियेत असल्याचं म्हटलं. सुभाष चंद्रा आणि पुनित गोएंका यांच्याविरुद्ध सेबीच्या चौकशीमुळे सोनी आणि झी यांच्यातील करार पुढे जाऊ शकला नाही. दोन्ही कंपन्यांमध्ये २०२१ मध्ये करार झाला होता. त्यानुसार गोयंका यांना विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीचे सीईओ बनवले जाणार होते, परंतु सेबीच्या तपासामुळे सोनीला ते सोयीचं वाटत नव्हतं. शेवटी त्यांनी जानेवारीमध्ये करार रद्द केला. दरम्यान, मंगळवारी पुन्हा एकदा झी सोनीसोबत कराराच्या शक्यता तपासून पाहत असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली होती.
सेबीची बंदी
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, सेबीनं झीचे संस्थापक सुभाष चंद्रा आणि पुनित गोएंका यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये कार्यकारी किंवा संचालक बनण्यास मनाई केली होती. चंद्रा आणि गोयंका यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि स्वत:च्या फायद्यासाठी निधीची अपहार केल्याचे सेबीला त्यांच्या तपासात आढळून आलं. झी नं सेबीच्या या आदेशाविरुद्ध उच्च अपीलीय प्राधिकरणात अपील केलं होतं आणि ऑक्टोबरमध्ये त्यांना दिलासा मिळाला होता. सेबीच्या तपासादरम्यान अपील प्राधिकरणानं गोयंका यांना कार्यकारी पदावर राहण्याची परवानगी दिली होती. गेल्या आर्थिक वर्षात झीच्या नफ्यात ९५ टक्के घट झाली होती. डिसेंबर तिमाहीत कंपनीला ५८.५४ कोटी रुपयांचा नफा झाला होता.