Join us

चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं? पगारही थकवला, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:13 IST

Technicolor India Layoff : जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅनिमेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेक्निकलर इंडियाचे जवळपास २ हजार कर्मचारी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

Technicolor India Layoff : सध्या टेक्नोलॉजी क्षेत्रात जगभरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. फेसबुक, सॅमसंग, अ‍ॅपल सारख्या कंपन्यांनी मोठी नोकरकपात सुरू केली आहे. याची झळ चित्रपट क्षेत्रांनाही बसत आहे. मुफासा : द लायन किंग, कुंग फू पांडा, मेडागास्कर आणि पुस इन बूट्स यांसारख्या हॉलीवूड अ‍ॅनिमेशन चित्रपटांसाठी काम करणारे सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. २४ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे ते कार्यालयात पोहोचल्यावर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलवणार का? की कायमचं काढून टाकण्यात आले आहे? याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नाही. धक्कादायक म्हणजे, त्यांचे थकीत वेतनही अद्याप दिलेले नाही.

टेक्निकलर इंडिया असं या जागतिक अ‍ॅनिमेशन कंपनीचे नाव आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या २ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. २४ फेब्रुवारी रोजी कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांना घरी परतण्यास सांगण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अद्याप फेब्रुवारीचा पगार दिला नसल्याचे सांगितले. तसेच कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढण्याचा आरोप केला आहे.

कंपनीत १० हजारांहून अधिक कर्मचारीटेक्निकलर इंडिया या कंपनीचे पॅरिसमध्ये मुख्यालय असून टेक्निकलर ग्रुप ही जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट कंपन्यांपैकी एक आहे. त्यांच्या भारतीय शाखेने मुफासा : द लायन किंग, पुस इन बूट्स, मेडागास्कर 3, कुंग फू पांडा इत्यादी हॉलिवूड चित्रपटांवर काम केले आहे. कंपनीने गेल्या सोमवारी आपली यूएस शाखा बंद केल्याची घोषणा केली. मात्र, भारतातील कामकाज बंद करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. भारतात, कंपनीची मुंबई आणि बंगळुरू येथे कार्यालये आहेत, जिथे २,००० हून अधिक लोक काम करतात. जागतिक स्तरावर, कंपनीचे फ्रान्स, अमेरिका, कॅनडा आणि भारतात १०,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

कंपनीकडून अधिकृत माहिती नाही.टेक्निकलरच्या बंगळुरूस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितले की, 'मी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात पोहोचलो, तेव्हा सर्व गोष्टी सामान्य होत्या. त्याचवेळी मुंबईतील माझ्या एका सहकाऱ्याने मला फोन करून टेक्निकलर बंद झाल्याची माहिती दिल्यानंतर मला धक्का बसला. जगातील इतर शाखांबद्दल मी जेव्हा बातमी वाचली. तेव्हा त्यात भारताचा उल्लेख नव्हता. मात्र, त्यानंतर एचआल आले आणि त्यांनी आपापल्या सर्व वस्तू घेऊन घरी जाण्यास सांगितले. त्यांनाही याची माहिती नव्हती. कर्मचाऱ्यांना याबद्दल काहीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, कंपनीने अद्याप अधिकृतपणे काहीच जाहीर केले नाही. 

टॅग्स :नोकरीकामगार