Join us  

२ हजारांची नोट बंद झाली, तुमच्यावर काय परिणाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 10:42 AM

यामुळे बँकांना मोठा फायदा होणार आहे.

चंद्रकांत दडस, उपसंपादक

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या निर्णयानंतर बँकांनी या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे बँकांना मोठा फायदा होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेतील तरलता, बँक ठेवी आणि व्याजदरांवर परिणाम होणार आहे. त्याच वेळी, याचा सामान्य माणसाच्या बचतीवरही काही प्रमाणात परिणाम होईल. नेमके काय होईल जाणून घेऊ...

- बँकांना ठेवींची गरज असून रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे बँकांच्या ठेवींमध्ये सुमारे २ लाख कोटी रुपयांची वाढ होईल. बँकेत पैसा आला तर त्याचा वापर करणे शक्य होईल. यामुळे बाजारात पैसाही येईल. एकूण बँकिंग प्रणालीच्या आरोग्यामध्ये सुधारणा केल्याने बँकिंग फंडांची कामगिरी चांगली होऊ शकते. बँकिंग क्षेत्राचे आरोग्य सुधारल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

- ठेवींच्या दरात वाढ करण्याचा बँकांवरील दबाव कमी होईल. याशिवाय आरबीआय पुढील बैठकीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून यापुढील काळात ठेवींचे व्याजदर कायम राहण्याची शक्यता आहे.

- पुरेशा रोख रकमेमुळे व्याजदर वाढीला विराम दिला जाऊ शकतो किंवा बँका भविष्यात कर्जाचे दर कमी करू शकतात. याचा कर्जदारांना मोठा फायदा होईल. 

- याचा परिणाम रोखे बाजारातही दिसून येईल. तरलतेत सुधारणा झाल्यामुळे शॉर्ट टर्म सरकारी रोख्यांचे व्याजदर कमी होऊ शकतात.

- काही काळासाठी सोने खरेदी वाढण्याची शक्यता आहे. सोने खरेदीसाठी लोक २,००० रुपयांची नोट वापरतील. त्याचबरोबर काही लोक हे पैसे घर घेण्यासाठीही गुंतवतील. याशिवाय इतर काही लक्झरी वस्तूंची खरेदीही वाढू शकते.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक