19 मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. ग्राहकांना या नोटा जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची वेळदेण्यात आली आहे. 23 मे पासून बँकांनी ते परत घेण्यास सुरूवात केली. परंतु गेल्या 15 दिवसांत 2000 रुपयांच्या किती नोटा बँकेत परत आल्या हे तुम्हाला माहिती आहे का? पाहूया नक्की किती नोटा बँकेत परत आल्या.
गेल्या महिन्यात 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर 2 हजारांच्या निम्म्या नोटा परत आल्या आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी दिली. यावर्षी 31 मार्च रोजी देशात 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. त्यातील निम्म्या नोटा परत आल्या म्हणजे 9,050,000,000 नोटा परत आल्या आहेत. म्हणजे या घोषणेनंतर आतापर्यंत सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. 2 हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या असल्या तरी त्यांची कायदेशीर मान्यता मात्र कायम आहे.
2000 रुपयांच्या ज्या नोटा परत येत आहेत, त्यापैकी 85 टक्के नोटा बँकेत जमा झाल्यानं परत आल्या आहेत. उर्वरित विविध बँक शाखांमध्ये अदलाबदल करण्यात आल्या आहेत. 19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती.