मुंबई : देशातील नोटांची टंचाई आता संपली आहे. तथापि, २ हजारांच्या नोटा ज्या प्रमाणात बँकांमधून काढल्या जात आहेत, त्या प्रमाणात त्या पुन्हा बँकांत येईनाशा झाल्या आहेत, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाचे (एसबीआय) चेअरमन रजनीशकुमार यांनी केले आहे.गेले काही दिवस देशाच्या विविध भागांत नोटांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. एटीएम रिकामे होते, बँकांतूनही लोकांना पैसे मिळत नव्हते. यावर रजनीशकुमार यांनी म्हणाले की, नोटांची टंचाई आता दूर झाली आहे. एटीएममध्ये रोख उपलब्ध असण्याचे प्रमाण आता सरासरी ८६ टक्के आहे. बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक यांना नोटाटंचाईचा सर्वाधिक फटका बसला होता. तिथे आता नोटांची उपलब्धता ८३ टक्के आहे. नोटांच्या टंचाईची अनेक कारणे होती. नोटांची मागणी वाढली होती. मध्य प्रदेशातील धान्य खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना देणे होते, असे सांगून रजनीश कुमार म्हणाले की, २,000 व ५00 रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी होता. तो आता नाही. शिवाय एटीएमची पुनर्रचना सुरू झाली आहे.रिझर्व्ह बँकेने अधिक नोटांची मागणी नोंदविली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, ही नियमित प्रक्रिया आहे. गरजेनुसार मागणी नोंदविली जाते. आम्ही गरजेनुसार, नोटांची मागणी नोंदवितो. ज्या बँका नोटांच्या बाबतीत आमच्यावर अवलंबून आहेत, त्यांची मागणीही आता सामान्य झाली आहे.नोटांचे होते तरी काय?रजनीशकुमार यांनी सांगितले की, २ हजारांच्या जेवढ्या नोटा बँकांत परत यायला हव्या तेवढ्या येताना दिसत नाहीत. लोक नोटांचे काय करीत आहेत, कोणास ठाऊक.
२०००च्या नोटा परतेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 3:59 AM