देशात २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. एका महिन्यात तब्बल ७२ टक्के नोटा बँकांमध्ये जमा किंवा बदलल्या गेल्या असल्याची माहिती समोर आलीये. महिनाभरापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद मागे घेतल्याची घोषणा केली होती. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भातील माहिती देत ७२ टक्के म्हणजेच सुमारे २.६२ लाख कोटी रूपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा किंवा बदलल्या गेल्या असल्याचं सांगितलं.
रिझर्व्ह बँकेनं १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना त्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर २३ मे पासून बँकांमध्ये या नोटा बदलण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, एका वेळी २० हजार रुपये मूल्याच्या नोटा बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
३० सप्टेंबरपर्यंतची वेळ
एक व्यक्ती एका वेळी २ हजार रुपयांच्या २० हजार रुपये मूल्याच्या नोटाच बदलू शकते. या जमा करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेनं एक सर्क्युलरही जारी केलं होतं. २ हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्यात आल्या असल्या तरी ते चलन म्हणून वैधच राहणार आहे. मार्च २०१७ पूर्वी २ हजार रुपयांच्या ८९ टक्के नोटा जारी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. दरम्यान, ३० सप्टेंबर पर्यंत बँका २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची सुविधा देणार आहेत.