Join us

20,000 किलो सोनं, भारत या वर्षी खोदून काढणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 6:25 AM

तब्बल 20 हजार किलो (20 टन) सोन्यासाठी खोदकामाची तयारी सुरू केली आहे. त्याचीच ही धमाल माहिती. 

सोनं... भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण आजही भारतीयांना सोन्याची हौस भागविण्यासाठी सोन्याच्या आयातीवरच अवलंबून राहावे लागते, पण लवकरच हे चित्र बदलणार असून, सोन्याच्या उत्खननामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने भारतीय सुवर्ण उद्योगाने एक भक्कम पाऊल टाकत तब्बल 20 हजार किलो (20 टन) सोन्यासाठी खोदकामाची तयारी सुरू केली आहे. त्याचीच ही धमाल माहिती. 

भारतात सोन्याचे किती साठे आहेत? 

केंद्रीय खनिजकर्म उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याच्या खाणीत एकूण  ७०.१ टन इतके सोने आहे. यापैकी सर्वात जास्त सोने म्हणजे तब्बल ८८% सोने हे एकट्या कर्नाटकातील खाणींत आहे, तर आंध्र प्रदेशात १२% आणि झारखंडमध्ये ०.१ टन सोने आहे. कर्नाटकातील रायचूरमध्ये हट्टी गोल्ड माइनमध्ये सर्वप्रथम १९४७ साली सोन्याचे उत्खनन सुरू झाले. तेव्हापासून २०२० पर्यंत या खाणीतून एकूण ८४ टन सोन्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, यातील उत्पादनाचा वेग तुलनेने अत्यल्प म्हणजे केवळ १.९ टन इतकाच आहे.  

भारतीयांचे सोने प्रेम अडीच ट्रिलियन डॉलरचे! जगात वर्षाकाठी होणाऱ्या सोने खरेदीमध्ये भारत आणि चीन हे दोन देश आघाडीवर आहेत. या दोन्ही देशांतर्फे एकूण जागतिक सोने खरेदीच्या ५७%खरेदी केली जाते.  भारतीयांच्या घरात असलेल्या सोन्याचा अंदाजित आकडा हा २२,५०० टन इतका असून, त्याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. २०२१च्या आर्थिक वर्षात भारतात अडीच ट्रिलियन डॉलर सोन्याची आयात झाली. रुपयांत २.५ या आकड्यावर पुढे किमान १३ शून्य लागतात. २०२० या वर्षामध्ये भारतात एकूण ४४६.४० मेट्रिक इतक्या भरभक्कम सोन्याची खरेदी झाली.

सोने आपल्यापर्यंत अत्यंत चकचकीत स्वरूपात येते. मात्र, आपल्यापर्यंत येणाऱ्या सोन्याचा प्रवास मात्र क्लिष्ट आहे.भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत तपासणी झाली आणि एखाद्या जागी सोन्याचे साठे सापडल्यावर, ती जागा अधिग्रहित करण्यापासून सोने निर्मितीचा प्रवास सुरू होतो. 

कसे काढले जाते खाणीतून सोने ? 

एकदा ही जागा ताब्यात आली की, सर्वप्रथम तिथे मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. सोने असे वरवर मिळत नाही, तर त्याकरिता भूगर्भात किमान साडेतीन किलोमीटर आतपर्यंत शिरावे लागते. तिथंवर शिरल्यानंतर, ज्या खडकांमध्ये सोने लपले आहे ते खडक दिसू लागतात. ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने हे खडक फोडले जातात आणि ते ट्रॉलीच्या माध्यमातून जमिनीपर्यंत पाठविले जातात. जमिनीवर आलेले खडक नजीकच्याच प्रकल्पात नेऊन त्याचे क्रशिंग होते. अर्थात, या खडकांचे अत्यंत बारीक तुकडे केले जातात.  

क्रशिंग केल्यानंतर सायनाइड आणि कार्बन यांच्या मिश्रणात हे खडक भिजविले जातात. या दोन्ही रसायनांमध्ये दगड पूर्णतः वितळतो आणि कार्बनचे कवच धारण करत कच्चे सोने दिसू लागते.

या प्रक्रियेनंतर अत्युच्य तापमानात हे कच्चे सोने वितळविले जाते आणि यातून कार्बन उडून जातानाच, शुद्ध सोन्याचे चकाकते रूप डोळ्यांना दिसू लागते. सोन्याची शुद्धता ही या पातळीवर ठरते. किती सर्वोच्च तापमानाला सोने वितळविले आहे आणि त्यातून किती टक्के शुद्धता मिळू शकते, हे तेव्हा समजते. सरासरी 

९९.५% शुद्धतेपर्यंत सोने गाळण्याचा उच्चांक जगात प्राप्त झालेला आहे.गाळलेल्या सोन्यातून मिळालेले बारीक सोनेरी कण हे पुढे उत्पादन प्रकल्पात पाठविले जातात आणि तिथे बाजारपेठेच्या मागणीनुसार, त्याची वीट, बिस्किटे, चीप अशी बांधणी होते आणि तिथून मग हे सोने खुल्या बाजारात आपल्यापर्यंत विक्रीसाठी येते.  

 

टॅग्स :सोनंव्यवसायदागिने