मुंबई : मार्च २०२० पर्यंत भारतातील सर्व वाहने १०० टक्के सुरक्षित होतील. भारतीय वाहनांमधील सुरक्षेसंबंधीचे तंत्रज्ञान प्रगत देशांमधील तंत्रज्ञानाइतकेच सक्षम व तुल्यबळ असेल, अशी ग्वाही महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी दिली.
इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनीअरिंग सोसायटीची (फिसिता) आंतरराष्टÑीय परिषद आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच भारतात चेन्नईत होत आहे. यासंबंधी डॉ. गोएंका यांनी सांगितले की, अनेक विदेशी कंपन्या भारतीय आॅटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. पण तंत्रज्ञानात ते गुंतवणूक करीत नाहीत. भारतीय तंत्रज्ञानावर त्यांचा अद्याप विश्वास नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच भारतीय तंत्रज्ञानही सरस आहे, हे या परिषदेद्वारे जगाला दाखवून दिले जाणार आहे. सोसायटी आॅफ आॅटोमोटिव्ह इंजिनीअर्स इंडिया (एसईआय इंडिया) या परिषदेची आयोजक आहे.
लिथियम बॅटरींची समस्या सुटेल
इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्यावश्यक असलेली लिथियम बॅटरीची समस्या पुढील आठ ते दहा वर्षांत सुटेल. जगभरात लिथियमचा साठा मुबलक आहे. त्या तुलनेत सध्या मागणी अत्यल्प आहे. त्यामुळे भारताने आतापासून प्रयत्न सुरू केल्यास, येत्या काही वर्षांत या बॅटरी सहज उपलब्ध होतील, असे डॉ. गोएंका यांनी या वेळी सांगितले.