नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी २०२० चे ‘विध्वंसक वर्ष’ असे वर्णन केले असून, २०२१ कडून वैज्ञानिक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
बिल गेट्स यांनी मंगळवारी आपल्या वैयक्तिक ब्लॉग ‘गेटस नोट्स’वर चालू वर्षाला निरोप देणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या साथीने जगभरात १.६ दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे. ७३ दशलक्ष लोकांना संसर्ग झाला आहे. आर्थिक नुकसानीचा आकडा लक्षावधी कोटींमध्ये आहे. जॉर्ज फ्लॉयड आणि ब्रेओन्ना टेलर यांची हत्या, जंगलांत सातत्याने पेटलेले वणवे आणि ‘न भूतो न भविष्यति’ अशी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, अशा घटनांनी अमेरिका आणि जग ढवळून निघाले.
गेट्स यांनी पुढे लिहिले की, २०२१ कडून चांगली बातमी येत आहे. कोणतीही नवी लस विकसित करण्यासाठी साधारणत: १० वर्षे लागत असताना शास्रज्ञांनी १० महिन्यांतच कोविड-१९ विरोधातील लस विकसित केली आहे. २०२१ बाबत लोकांच्या मनात आशावाद निर्माण करणारी ही घटना आहे. इतरही अनेक आशावादी वैज्ञानिक घडामोडींची अपेक्षा या वर्षाकडून आहेत. मॉडर्ना आणि फायझर/बायोएनटेक लसींचा उत्तम परिणाम अपेक्षित आहे. मृत्यू आणि संसर्गाच्या संख्येत लक्षणीय कपात होईल. जीवन सामान्य होण्याच्या नजीक आपण पोहोचत आहोत.
लोकांचे प्राण वाचविण्याबाबत खंबीर
कोरोनाला ‘खोटे’ म्हणून लसीभोवती संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा गेट्स यांनी आपल्या पोस्टमध्ये समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले की, असे सिद्धांत अजिबात मदतीला येणार नाहीत. मी आणि माझी पत्नी (मेलिंदा गेट्स) लसीला अर्थसाह्य करण्याच्या मुद्द्यावर सार्वजनिक पातळीवर चर्चा करीत राहू, कारण आम्ही लोकांचे प्राण वाचविण्याबाबत दृढ आहोत. प्रत्येक मुलाला प्रौढ होण्याची संधी मिळाली पाहिजे, असे आम्हाला वाटते.