वॉशिंग्टन : वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ९.६ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. २०२१ मध्ये वृद्धी होऊन ५.४ टक्क्यांवर जाईल, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने जारी केलेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट’मध्ये म्हटले आहे, कोविड-१९ साथीच्या काळात औपचारिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकूण अर्थव्यवस्था व रोजगार यातील या क्षेत्राचे योगदान चार पंचमांश आहे. या क्षेत्रालाच हादरे बसल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. अहवालात म्हटले आहे की, वृद्धी आधीच घसरणीला लागलेली असताना कोविड-१९ साथीचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. त्यामुळे वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्था ९.६ टक्क्यांनी घसरेल.
घरगुती खर्च आणि खासगी गुतंवणूक यात झालेली मोठी घसरण हे या घसरगुंडीचे मुख्य कारण आहे. अहवालात म्हटले की, २०२१ मध्ये भारताचा वृद्धिदर सुधारून ५.४ टक्के होण्याची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्थेच्या खालच्या पातळीवर चांगली वाढ दिसून येत आहे. तथापि, ठप्प झालेली खासगी गुंतवणूक आणि वित्तीय क्षेत्रातील कमजोरी यामुळे या वाढीवर मर्यादा पडत आहेत.रोजगारात चार पंचमांश वाटा असलेल्या अनौपचारिक क्षेत्रात साथ काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. सेवा आणि वस्तू उत्पादन क्षेत्रात सुधारणा गतिमान होताना दिसून येत आहे. वास्तविक साथीच्या आधीच वित्तीय क्षेत्रातील एनपीए उच्चपातळीवर होता.
अहवालात म्हटले आहे की, २०२०-२१ मध्ये पाकिस्तानचा वृद्धिदर ०.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. आशियाच्या इतर भागात कोविड-१९ चा फटका तसा कमी आहे. मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या पर्यटन व प्रवासावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांना लक्षणीय फटका बसला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतही येणार तेजीआगामी वर्षामध्ये कोरोनाची लस उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणावर लसीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा या अहवालात वर्तविण्यात आली आहे. सध्या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत अर्थव्यवस्था पाच टक्क्यांची घट दर्शवित असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनास काहीसा अधिक कालावधी लागत असल्याचेही स्पष्ट केले गेले आहे. आगामी आर्थिक वर्षामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था ३.५ टक्के तर युरोपची अर्थव्यवस्था ३.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षाही या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे. चीनची अर्थव्यवस्था ५.२ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असून आशियामधील उमलत्या अर्थव्यवस्थांमधील वाढीचा अंदाज ४.६ टक्के वर्तविण्यात आला आहे.