Join us

गुंतवणुकीची मोठी संधी! आगामी तिमाहीत IPO चा महापूर; ३५ कंपन्या ८० हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 2:27 PM

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: अलीकडील काळात शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड सुरू असून, गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत अनेकविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येऊन धडकल्याचे पाहायला मिळाले. अनेक नव्या कंपन्यांनी एन्ट्रीलाच दमदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले, तर काही कंपन्यांनी निराशाच पदरी पाडली. (in 2021 third quarter 35 companies to raise rs 80000 crore through ipo)

ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत IPO चा महापूर येणार असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ३५ कंपन्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ८० हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहेत. यामध्ये पेटीएम, आधार हाऊसिंग फायनान्स, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, पॉलिसीबाजार आणि अदानी विल्मर सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

बाजार नियामक सेबीकडून मंजुरी 

IPO आणण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून १४ कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये परदीप फॉस्फेट्स, गो एअरलाइन्स, रुची सोया इंडस्ट्रीज, आरोहन फायनान्शिअल सर्व्हिसेस, उत्कर्ष स्मॉल फायनान्स आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स यांचा समावेश आहे. या कंपन्या सुमारे २२ हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. तर दुसरीकडे, ६४ कंपन्यांनी आयपीओ (IPO) साठी सेबीकडे DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स) दाखल केले आहेत.

पॉलिसीबझार, नायकाचे IPO ऑक्टोबरमध्ये अपेक्षित

पॉलिसीबझार आणि नायकाचे आयपीओ या ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहेत. त्यांचा आकार अनुक्रमे ६ हजार कोटी आणि ४ हजार कोटी रुपये असू शकतो. चेन्नईस्थित स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थचा ७ हजार कोटी रुपयांचा आयपीओ या वर्षाच्या अखेरीस येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 

ऑक्टोबरमध्ये या कंपन्यांचे IPO येणार

मोबिक्विक, परदीप फॉस्फेट्स, सीएमएस इन्फोसिस्टम्स, नॉर्दर्न आर्क, सफायर फूड्स आणि टार्सन्स प्रॉडक्ट्सचे ऑक्टोबरमध्ये IPO येऊ शकतात, तर डिजिटल पेमेंट फर्म पेटीएमचा बहुप्रतिक्षित IPO नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो. चीनची अँट ग्रुप आणि जपानची सॉफ्टबँक यांच्या गुंतवणुकीसह घरगुती फिनटेक फर्म पेटीएमने १६ हजार ६०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी अर्ज केला आहे. हा आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा IPO आहे. त्याला अद्याप नियामक मान्यता मिळणे बाकी आहे.

दरम्यान, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी २०२१ मध्ये आयपीओद्वारे उभारलेल्या निधीमध्ये ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकूण निधीच्या ती ५५ टक्के आहे. १ एप्रिलपासून सूचीबद्ध २४ आयपीओपैकी १८ त्यांच्या ऑफर प्राइजपेक्षा जास्त व्यापार करत आहेत, तर ६ आयपीओंनी नकारात्मक परतावा दिला आहे. पारस डिफेन्स, अमी ऑर्गेनिक्स, तत्व चिंतन फार्मा, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, क्लीन सायन्स आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या शेअर्सची इश्यू प्राइस दुप्पट झाली आहे. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार