नवी दिल्ली : व्हॅलेंटाईन डे निमित्त होणाऱ्या विविध भेटवस्तू आणि अन्य सामानाच्या विक्रीचा व्यवहार यंदा २२ हजार कोटींपेक्षाही जास्त राहील, असा अंदाज उद्योग क्षेत्रातील संघटना असोचेमने व्यक्त केला आहे. असोचेमने जारी केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार, यंदा व्हॅलेंडाईन डेच्या व्यवसायात ४0 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रिटिंग कार्ड, फुलांचे गुच्छ, सोने आणि हिऱ्यांचे दागिने, चॉकलेट, खेळणी, तयार कपडे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळे आदी वस्तूंची व्हॅलेंटाईन डे निमित्त जोरात विक्री होण्याची व्यावसायिकांना आशा आहे. असोचेमने म्हटले की, २0१४ च्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने किरकोळ क्षेत्रात १६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. यंदा त्यात ४0 टक्क्यांची वाढ होऊन हा व्यवसाय २२ हजार कोटींवर जाईल. यंदा दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आॅनलाईन खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.एकूण विक्रीत आॅनलाईनचा वाटा ३२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी आॅनलाईन खरेदीचे प्रमाण २0.५ टक्के होते. असोचेमचे हे सर्वेक्षण व्यापक पातळीवर करण्यात आले आहे. संघटित आणि आॅनलाईन शॉपिंग क्षेत्रातील जवळपास ६00 कंपन्यांशी संघटनेने बातचीत केली आहे. या कंपन्यांत भेटवस्तू, दागिने, टॉफी-चॉकलेट विक्रेते, तयार कपडे, प्रवासी कंपन्या, एअरलाइन्स कंपन्या, माबाईल आणि दूरसंचार, तसेच इलेक्ट्रानिक्स कंपन्या यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२२ हजार कोटींचा ‘व्ही’डे!
By admin | Published: February 12, 2015 11:41 PM