Join us

Credit Card लिमिट वाढवण्याच्या नादात घालवले २२ हजार रुपये, लालसेपोटी करू नका हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 8:25 AM

सायबर फसवणूक टाळायची असेल तर आतापासूनच सतर्क व्हायला हवं. नुकतंच एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. 

सायबर फसवणूक एवढी वाढली आहे की याबद्दल जवळजवळ दररोज ऐकायला मिळते. नुकतेच असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका वृत्तानुसार एका महिलेने सोशल मीडियाद्वारे नोकरीसाठी अर्ज करताना बँकेतून ५ लाख रुपये गमावले. दरम्यान, एका व्यक्तीने ऑनलाइन वस्तू मागवण्याचा प्रयत्न करताना व्हॉट्सॲप घोटाळ्यात ४४,७८२ रुपये गमावले. नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनचे रिन्यू करताना एका व्यक्तीने ऑनलाइन फसवणुकीत १ लाख रुपये गमावले. बँक आणि ओटीपी फसवणूक सर्वात सामान्य आहे. एका २९ वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन फसवणुकीत २२ हजाारांपेक्षा जास्त गमावले.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुंबईतील एका व्यक्तीने झालेल्या फसवणुकीत २२,३९६ रुपये गमावले. काळबादेवी येथील रहिवासी आणि कपड्याच्या दुकानात विक्री व्यवस्थापक असलेले रामसिंग राजपूत त्यांच्या कोटक महिंद्रा क्रेडिट कार्डवरील लिमिट वाढवण्याचा प्रयत्न करत होते. हे करत असताना त्यांची फसवणूक झाली आणि एका अनव्हेरिफाईड लिंकवर त्यांनी ओटीपी टाकला.

१५ जानेवारी रोजी, प्रियांका अशी स्वतःची ओळख सांगितलेल्या एका राजपूत यांच्याशी बोलणे केले आणि आपल्या क्रेडिट कार्ड मर्यांदा वाढवता येणार असल्याचे सांगितले. तेव्हा फसवणूक करणाऱ्याने त्याला एक लिंक पाठवली आणि त्यात ओटीपी टाकण्यास सांगितले. असे केल्यावर महिलेने त्याच्या बँक खात्यातून २२,३९६ रुपये ट्रान्सफर केले.

सर्वाधिक बँकिंग फ्रॉडरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार सर्वात फसवणूक बँकिंगमध्ये होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सप्टेंबर २०२२ ला संपणाऱ्या ६ महिन्यांच्या कालावधीत २२३१ फसवणुकीच्या घटना घडल्या ज्यात ८७ कोटी रुपयांची फसवणूक झाली. रिझर्व्ह बँकेने शेअर केलेल्या तपशिलानुसार, २०२१ च्या तुलनेत सायबर फसवणुकीच्या प्रकरणांची सरासरी संख्या थोडी कमी झाली आहे. 

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका असे वारंवार सांगितले जाते. बहुतांश प्रकरणांमध्ये ओटीपी शेअर करणे किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यातून फसवणूक केली जाते.

टॅग्स :सायबर क्राइमभारतीय रिझर्व्ह बँक