यवतमाळ : विदर्भ-खान्देशात कापसाची स्थिती चांगली असली, तरी उर्वरित महाराष्ट्र आणि एकूणच भारतात कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे एखादवेळी बाजारातील कापसाचे भाव ४५०० प्रति क्ंिवटलपर्यंत जाऊ शकतात. मात्र ते दीर्घकाळ टिकणार नाहीत, असा अंदाज सीसीआय (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने वर्तविला आहे.
या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, यावर्षी सीसीआयचे दिवाळीदरम्यान विदर्भात २३ खरेदी केंद्र उघडले जातील. आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. गेल्या वर्षी विदर्भात सीसीआयने ३४ खरेदी केंद्र उघडले होते. सीसीआयचे खरेदी केंद्र उघडण्यात ‘सीपीओ’ (अर्थात चीफ पर्चेसिंग आॅफिसर) च्या रिक्त पदांची अडचण आहे.
गेल्या आठ वर्षात सीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले. त्या तुलनेत भरती झाली नाही. जे भरती झाले त्यांना केवळ एक-दोन वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण कापूस खरेदी केंद्राची जबाबदारी सोपविणे शक्य होणार नाही. त्यावर पर्याय म्हणून यावर्षी पंजाब, हरियाणा, राजस्थान येथील ‘सीपीओं’ना विदर्भातील कापूस खरेदी केंद्रांवर आणले जाईल. कारण त्या भागात कापूस उत्पादनाची अवस्था वाईट असल्याने तेथे खरेदी केंद्रांची तेवढी गरज पडणार नाही.
हा अधिकारी म्हणाला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये कापसाचे पीक चांगले आहे. त्या तुलनेत वाशिम व अकोल्यात कापूस समाधानकारक नाही. महाराष्ट्रात गतवर्षी ७८ लाख रूईगाठी (बेल्स) झाल्या होत्या. यावर्षी त्यात तीन लाख गाठींची घट येईल. विदर्भात ३८ लाख गाठींचा अंदाज आहे.
मराठवाड्यात कापसाचे उत्पादन ४० टक्क्याने घटणार आहे. बीड व परभणीमध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. तेथे सुमारे १२ लाख रूईगाठींची क्षमता आहे. मात्र यावर्षी या दोन जिल्ह्यात पावसाअभावी कापसाचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात मोठा फटका बसणार आहे. खान्देशात मात्र कापसाची स्थिती चांगली राहील. गुजरातमध्ये सध्या कापसाला ४ हजार ५०० रुपये प्रति क्ंिवटल भाव मिळत असल्याने राज्यातून सहा ते सात लाख गाठींचा कापूस तिकडे जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीत उघडणार २३ कापूस खरेदी केंद्रे
विदर्भ-खान्देशात कापसाची स्थिती चांगली असली, तरी उर्वरित महाराष्ट्र आणि एकूणच भारतात कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे एखादवेळी बाजारातील कापसाचे भाव ४५०० प्रति
By admin | Published: October 20, 2015 03:39 AM2015-10-20T03:39:49+5:302015-10-20T03:39:49+5:30