लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान जनधन योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील दशकभरात या योजनेतून देशभरात एकूण ५३.१३ कोटी जनधन खाती विविध बँकांमध्ये उघडण्यात आली आहेत. अर्थ मंत्रालयाने बुधवारी याबाबत ही माहिती दिली. जनधन खात्यांमध्ये जमा असलेली एकूण रक्कम आता २,३१,२३६ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
या खात्यांवर यूपीआय आधारित पेमेंट मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मध्ये खात्यांवर झालेल्या डिजिटल व्यवहारांची संख्या २,३३८ कोटी इतकी होती. हीच संख्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात १६,४४३ कोटींच्या घरात पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा केली होती. सर्वसामान्य नागरिकांना बँकिंगच्या कक्षेत आणणे हा योजनेमागचा मुख्य उद्देश होता.
खात्यांमधील जमा १५ पट वाढली
- १४ ऑगस्ट २०२४ रोजी जनधन खात्यांच्या संख्येत ३.६ पट वाढ झाली असून या खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम १५ पटींनी वाढली आहे.
- दहा वर्षांपूर्वी या खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम सरासरी ४,३५२ रुपये इतकी होती. तीच रक्कम आता चार पटींनी वाढली आहे.
- या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ३६.०६ कोटींपेक्षा अधिक रुपे डेबिट कार्ड देण्यात आली आहेत. ८९.६७ लाख पीओएस केंद्राची स्थापना करण्यात आली.
गोरगरीब बँकांशी जोडले गेले
- जनतेला माफक दरात बँकिंग, बचत, कर्ज सुविधा, विमा, पेन्शन आदी सुविधा देणे यामुळे शक्य झाले.
- मजूर, घरकाम करणाऱ्या महिला आदी घटकांना बँकिंगच्या मूळ प्रवाहात आणणे यामुळे शक्य झाले.
आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. मी जनधन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देतो. योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. जनधन योजनेने देशातील कोट्यवधि गोरगरीब बंधू-भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या योजनेमुळे बँकिग सेवांपासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत बचत खाते, विमा, कर्ज आदी आर्थिक सुविधा पोहचल्या आहेत. यामुळे मागील दशकभरात देशातील बँकिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. याद्वारे ३६ कोटींहून अधिक रुपे कार्ड मोफत दिली आहेत. २ लाखांची विमा सुरक्षा या खात्याद्वारे दिली जात आहे.
- निर्मला सीतारामन, अर्थमंत्री