बडोदा: मेडिकल इन्शुरन्स क्लेमसाठी २४ तास रुग्णालयात दाखल होणे आवश्यक नाही. आता काळ बदलला आहे, असे स्पष्ट करत वडोदराच्या ग्राहक मंच न्यायालयाने विमा कंपनीला त्याच्या ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश दिले.
बडोदा येथील रमेशचंद्र जोशी यांच्या याचिकेवर ग्राहक मंचाने हा निर्णय दिला. जोशी यांनी २०१७ मध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती. कंपनीने त्यांचा विम्याचा क्लेम देण्यास नकार दिला होता. जोशी यांच्या पत्नीला २०१६ मध्ये डर्माटोमायोसायटिसचा त्रास झाला झाल्याने त्यांना अहमदाबाद येथील लाइफकेअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जोशी यांनी यासाठी विमा कंपनीकडे ४४,४६८ रुपयांचा क्लेम केला. नियमानुसार रुग्णाला २४ तासांपर्यंत दाखल करण्यात आले नसल्याचा युक्तिवाद करून कंपनीने क्लेम नाकारला होता.
मंचाने काय म्हटलं?
- रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे की नाही, हे विमा कंपनी ठरवू शकत नाही.
- रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन केवळ डॉक्टरच निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. फोरमने विमा कंपनीला क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून ९ टक्के व्याजासह ४४,४६८ रूपये जोशी यांना देण्याचे आदेश दिले.
- मानसिक त्रासापोटी ३ हजार रूपये आणि खटल्याच्या खर्चासाठी २ हजार रूपये देण्याचे आदेशही दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"