ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - जर तुमचं वार्षिक उत्पन्न 18 लाखांपर्यंत असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच घरखरेदी करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला 2.4 लाखांचा फायदा होणार आहे. सरकार गृहकर्जाच्या व्याजावर सबसिडी देणार आहे. सध्या ही सबसिडी वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत असणा-यांच दिली जात आहे. रिअल इस्टेट मार्केटला गती देण्याच्या दृष्टीकोनातून आणि 2022 तर सर्वांना पक्की घर देण्याचं ध्येय पुर्ण करण्यासाठी सरकारडून सबसिडीचे दोन स्लॅब तयार करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी घरखरेदी सबसिडी योजना जाहीर केली होती. मात्र त्याचे तपशील आता जाहीर झाले आहेत. नवीन योजनेअंतर्गत घरखरेदी करणा-यांना त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे सबसिडी दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेली ही योजना तीन वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी आणि फक्त पहिलं घर खरेदी करणारांसाठी आहे. त्यानुसार सर्वच उत्पन्न गटातील घर खरेदीदारांना व्याजाच्या रकमेत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या या योजनेनुसार आधी फक्त 15 वर्षे मुदतीची गृहकर्जे ही अट रद्द करून ती 20 वर्षे करण्यात आली आहे.
जर तुमचं वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असेल तर सहा लाखांपर्यंतच्या कर्जावर 6.5 टक्क्यांची सबसिडी दिली जाईल. मुख्य गोष्ट म्हणजे कर्जाची रक्कम कितीही असली तरी तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमच्या गृहकर्जावरील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्क्यांची सवलत मिळेल. म्हणजे तुमच्या गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर तुम्हाला पहिल्या सहा लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज व्याज भरावं लागेल. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्क्यांप्रमाणे व्याज देय असेल.
याचप्रमाणे 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-यांना नऊ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर सरकार 4 टक्के सबसिडी देणार. तर 18 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-यांना 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के सूट मिळेल. जर नऊ टक्के व्याजदावर कर्ज घेतलं गेलं, तर तिन्ही विभागांमध्ये मिळण-या सबसिडीमुळे 20 वर्षांच्या कर्जावर कमीत कमी 2 लाख 40 हजारांचा फायदा होणार आहे. तसंच लोन रिपेमेंटच्या मासिक हफ्ता 2,200 रुपयांनी कमी होईल.