Join us  

२४ लाख फोक्सवॅगन कार जर्मनीत मागविल्या परत

By admin | Published: October 15, 2015 11:49 PM

प्रदूषण लपविणारे सॉफ्टवेअर वापरल्याचे उघड झाल्याने फोक्सवॅगन या कार कंपनीने जर्मनीतील डिझेलवर चालणाऱ्या २४ लाख मोटारी माघारी बोलावल्या आहेत.

फ्रँकफर्ट : प्रदूषण लपविणारे सॉफ्टवेअर वापरल्याचे उघड झाल्याने फोक्सवॅगन या कार कंपनीने जर्मनीतील डिझेलवर चालणाऱ्या २४ लाख मोटारी माघारी बोलावल्या आहेत.या प्रकरणाचा भंडाफोड होताच फोक्सवॅगनने एक निवेदन प्रसिद्ध करून संबंधित कारमालकांनी स्वत: घेऊन आपल्या मोटारी दुरुस्तीसाठी कंपनीकडे आणाव्यात, असे आवाहन केले होते. मात्र कंपनीचा हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याचे येथे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.याच प्रकरणाशी एका घटनाक्रमात इटालियन पोलिसांनी कंपनीच्या व्हेरोना आणि लांबोरगिनी येथील कार्यालयावर छापे मारले. या प्रकरणाची इटलीचे अधिकारीही चौकशी करीत आहेत. त्यासाठीच हे छापे मारण्यात आल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे.दरम्यान, आपण फोक्सवॅगनच्या उत्तर अमेरिकेच्या शाखेचे प्रमुख आहोत, असा दावा करणाऱ्या किनफ्रेंड वाहलॅन्द यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. त्या विभागातील कंपनीच्या धोरणाबाबत मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात या कंपनीच्या डिझेल कारमध्ये प्रदूषण फैलावणारे सॉफ्टवेअर वापरण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर स्वत: कंपनीनेही ११ लाख मोटारीत असे सॉफ्टवेअर बसविण्यात आल्याची कबुली दिली होती. भंडाफोड होताच कंपनीच्या प्रमुखांनी राजीनामा दिला. नवीन प्रमुखांनी या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा देताना समस्येवर तोडगा काढण्यास आणखी काही अवधी लागेल, असे सांगितले होते.या प्रकरणामुळे कंपनीचे ६.५ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा कंपनीचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या महिनाभरात कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांनी गडगडले.