Join us  

Success Story: व्वा! २४ वर्षीय तरुणास मिळाले तब्बल २३ कोटींचे पॅकेज; सध्या घरातूनच काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:40 AM

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणास वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक २३ कोटी रुपये वेतनाची नोकरी मिळाली आहे.

चंपावत (उत्तराखंड) :

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यातील एका तरुणास वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जर्मनीतील एका नामांकित कंपनीत वार्षिक २३ कोटी रुपये वेतनाची नोकरी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

सध्या देशभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या तरुणाचे नाव यशवंत चौधरी असे असून तो उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील रहिवासी आहे. जर्मनीतील टेस्ला गिगाफॅक्टरी या कंपनीत त्याला नोकरी मिळाली आहे. कंपनीच्या बर्लिनमधील प्रकल्पात तो कर्तव्य बजावणार आहे. त्याला कंपनीने ३० लाख डॉलर म्हणजेच २३ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. त्याला  मिळालेल्या या गलेलठ्ठ पॅकेजमुळे त्याचे नाव तर भारतभर दुमदुमत आहेच, पण चंपावत जिल्हाही त्यामुळे अचानक प्रकाशझोतात आला आहे. चंपावत शहरात तर सध्या केवळ त्याच्या नावाची चर्चा आहे. यशवंत हा इंजिनिअर असून त्याला जर्मनीच्या टेस्ला गिगाफॅक्टरीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर नेमणूक मिळाली आहे. ऑगस्टमध्ये बंगळुरू येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर नोव्हेंबरमध्ये बर्लिनमध्ये त्याला नियुक्ती मिळेल.

सध्या घरातून काम- प्राप्त माहितीनुसार, यशवंत येत्या ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन काम करेल. - त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात त्याला बंगळुरू येथे प्रशिक्षण दिले जाईल. - प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये तो जर्मनीतील बर्लिन शहरास रवाना होईल. तेथे त्याची नियमित सेवा सुरू होईल.

व्यापाऱ्याचा मुलगा म्हणून ओळख- यशवंत हा चंपावतमधील प्रसिद्ध व्यापारी शेखर चौधरी यांचा पुत्र आहे. यशवंत याने पिथौरागढ येथे बीटेक केले. २०२० मध्ये झालेल्या गेट परीक्षेत त्याला राष्ट्रीय पातळीवर ८७० वा रँक मिळाला होता. - २ वर्षांपूर्वी प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून त्याची टेस्ला गिगाफॅक्टरीने निवड केली होती. कोरोना काळात त्याने ऑनलाईन सेवाही बजावली.

टॅग्स :टेस्ला