फूड स्टार्टअप मोमोमियाचे संस्थापक देबाशीष मजुमदार यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. १८०० रुपये महिना पगार असलेली नोकरी करून करिअरची सुरुवात करणाऱ्या देबाशीष यांनी काही वर्षातच आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. नंतर व्यवसायात नशीब आजमावलं पण यश मिळालं नाही आणि कर्जबाजारी झाले. पण, त्यांनी हिंमत हारली नाही. नोकरी सोडून मोमोज विकायला सुरुवात केली. एकेकाळी ८ लाखांचं त्यांच्यावर कर्ज होतं आणि आता ते महिन्याला २ कोटींहून अधिक कमावतात. मोमोमिया आज देशभर पसरलं आहे. देशभरात १०० हून अधिक आउटलेट आहेत.
एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या देबाशीष यांची अवस्था त्यांच्या पहिल्या व्यवसायात अयशस्वी झाल्यानंतर इतकी वाईट झाली की, त्यांच्याकडे पत्नीला बूट घेण्यासाठी २०० रुपयेही नव्हते. पण, देबाशीष खचले नाहीत. ते असा व्यवसाय शोधत राहिले ज्यामध्ये चांगली कमाई होईल आणि तो व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
ॲक्सिस बँकेत काम करत असताना, देबाशीष यांनी आईस्क्रीमचं दुकान सुरू केलं. मात्र, हा व्यवसाय फसला आणि त्यांचं अंदाजे आठ लाख रुपयांचं नुकसान झालं. हा धक्का बसूनही त्यांनी आशा सोडली नाही आणि स्वत:चा यशस्वी व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत राहिले. त्यांनी बँकेतील नोकरी सोडली आणि २०१८ मध्ये फक्त तीन कर्मचारी आणि ३.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह मोमोमिया सुरू केलं.
आईस्क्रीम स्टार्टअप अयशस्वी झाल्यानंतर देबाशीष यांची परिस्थिती खूपच वाईट झाली. एकदा त्यांच्याकडे पत्नीला नवीन बूट घेण्यासाठी २०० रुपयेही नव्हते. आर्थिक विवंचनेमुळे आईची शस्त्रक्रियाही करता आली नाही. इतकं सगळं असूनही त्यांनी उद्योगपती होण्याचं स्वप्न सोडलं नाही.
देबाशीष मजुमदार गुवाहाटी येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे त्यांनी मोमोज ऑर्डर केले. त्यांना रेस्टॉरंटने दिलेल्या मोमोजची क्वालिटी आणि चव दोन्ही आवडलं नाही. मग त्यांच्या मनात मोमोज आउटलेट सुरू करण्याचा विचार आला. मोमोजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना खात्री होती की त्यांनी चांगल्या दर्जाचे आणि व्हरायटी असलेले चांगले मोमो दिले तर प्रचंड विक्री होईल.
२०१८ मध्ये देबाशीष यांनी गुवाहाटीमध्ये मोमोमियाचं पहिलं आउटलेट सुरू केलं. आज मोमोमियाचे देशभरात १०० हून अधिक आउटलेट आहेत. देबाशीष मोमोमियाची फ्रँचायझी देतात. मोमोमिया आउटलेटवर विविध प्रकारचे मोमो मिळतात. आज मोमोमिया कंपनीची वार्षिक उलाढाल २५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ते आता ४०० लोकांना रोजगार देत आहेत.