रतन टाटा आणि फ्रान्सची बडी विमान उत्पादन कंपनी एअरबसमध्ये आज मोठी डील झाली आहे. या बैठकीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन देखील होते. त्यांच्या समक्षच या डीलवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आज मोदी आणि मॅक्रॉन यांच्या अध्यक्षतेखाली एअर इंडियाकडूनरतन टाटा आणि एअरबसचे सीईओ, अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक झाली. यावेळी टाटा सन्सच्या अध्यक्षांनी आम्ही एअरबससोबत नाते जोडले आहे. आम्ही एअरबसकडून 250 विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असे सांगितले.
टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडिया एअरबस कंपनीकडून 250 विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये 40 वाइड बॉडी ए-350 विमाने आणि 210 नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे.
या ऐतिहासिक करारासाठी मी एअर इंडिया-एअरबसचे अभिनंदन करतो. तसेच या करारावेळी उपस्थित राहिल्याबद्दल इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. भारताच्या मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत, असे मोदी म्हणाले.
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला पुढील 15 वर्षांत 2000 हून अधिक विमानांची आवश्यकता असेल. भारत या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल आणि दुरुस्ती केंद्र बनू शकतो, असेही मोदी यांनी म्हटले.