Join us

दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 6:14 AM

या काळात सोन्यासोबतच चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीची उलाढालही किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाजही त्यानी वर्तविला आहे.

मुंबई : दिवाळी सणाच्या निमित्ताने सोन्याच्या खरेदी-विक्रीला आता वेग आला असून, जुने सोने देत नवे सोने घेण्यावर ग्राहकांचा भर असल्याचे आता समोर येत आहे. त्यातही सोन्याची नाणी खरेदी करण्यासोबत हलक्या वजनाचे दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे, अशी माहिती सराफ बाजारातील व्यावसायिकांनी दिली. या काळात सोन्यासोबतच चांदी आणि हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीची उलाढालही किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाजही त्यानी वर्तविला आहे.

भाऊबीजपर्यंत सोन्याचा बाजार तेजीत राहणार असून, दररोजची उलाढाल दोनशे कोटी रुपये होईल. ग्राहक जुने सोने देत आहेत आणि नवे सोने घेऊन जात आहेत. यात १० ग्रॅममागे ८ ग्रॅम सोने दिले जात आहे. आजघडीला रिसायकल सोन्याची खरेदी-विक्री जास्त होताना दिसत आहे.     - कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

सराफा बाजारात दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. यात सोने, चांदी आणि हिरे अशा सर्वच अलंकारांच्या व्यवहारांचा समावेश असेल. दिवाळीतसोबतच १५ दिवसांनी लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या सोन्याची खरेदी-विक्री होते आहे.    - आनंद  पेडणेकर,     संचालक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स

हलक्या वजनाचे दागिने खरेदी केले जात आहेत. त्यातही जे दागिने दिसायला अधिक आकर्षक किंवा लक्षवेधी आहेत अशा दागिन्यांची खरेदी जास्त होत आहे. याव्यतिरिक्त सोन्याची नाणी खरेदी करण्यावरही ग्राहकांचा अधिक भर आहे. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेला सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिक होतील.    - निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय