नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये भारतातील प्रवासी वाहनांची घाऊक विक्री २६.४५ टक्क्यांनी वाढली. सप्टेंबरमध्ये घाऊक पातळीवर २,७२,०२७ प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात २,१५,१२४ वाहनांची विक्री झाली होती.
‘सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) जारी केलेल्या डाटानुसार, दुचाकी वाहनांची एकूण विक्री ११.६४ टक्क्यांनी वाढली. १८,४९,५४६ दुचाकी या महिन्यात विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हा आकडा १६,५६,६५८ होता. यात मोटारसायकलींच्या विक्रीतील वाढ १७.३ टक्के राहिली. मोटारसायकल विक्रीचा आकडा गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील १०,४३,६२१ वरून १२,२४,११७वर गेला. स्कूटरची विक्री ५,५५,७५४ वरून ५,५६,२०५ वर गेली.
सियामने म्हटले की, तीनचाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल ७४.६३ टक्के घसरण झाली. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये १,८०,८९९ तीनचाकी वाहने विकली गेली होती. हा आकडा यंदाच्या सप्टेंबरमध्ये ४५,९०२ वर आला. सप्टेंबरच्या तिमाहीत सर्व श्रेणीतील वाहनांची विक्री किंचित घसरून ५५,९६,२२३वर आली. आदल्या वर्षात ५६,५१,४५९ वाहने विकली गेली होती.सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा यांनी सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत काही श्रेणींत सुधारणेचे संकेत मिळत आहेत. प्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांत सकारात्मक कल दिसून आला. या दोन्ही श्रेणीत गेल्या वर्षी विक्री कमी राहिली होती. यंदा वाढ दिसण्याचे तेही एक कारण आहे. व्यावसायिक वाहने आणि तीन चाकी वाहनांच्या क्षेत्रात विक्री पाच-सहा वर्षांपूर्वीसारखी राहिली. आगामी सणासुदीच्या काळात विक्री वाढेल, अशी उद्योगास आशा आहे.व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये घटसियामने म्हटले की, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत प्रवासी वाहनांची विक्री १७.०२ टक्क्यांनी वाढून ६,२०,६२० वरून ७,२६,२३२वर गेली. सप्टेंबर तिमाहीत दुचाकीची विक्री ४६,८२,५७१वरून ४६,९०,५६५ वर गेली. या तिमाहीत व्यावसायिक वाहनांची विक्री मात्र २०.१३ टक्क्यांनी घसरून १,३३,५२४ झाली. गेल्या वर्षी ती १,६७,१७३ इतकी होती.