संतोष वानखडे, वाशिम
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यातील ७३ लाख ४२ हजार ७४० जॉब कार्डधारक मजुरांपैकी २५ लाख ८६ हजार ८५२ मजुरांना बँक खाते क्रमांकाची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीत ४७ लाख ५५ हजार ८८८ मजुरांची बँक खाती उघडण्यात आली असून, यामध्ये अमरावती विभागातील ५ लाख ५८ हजार २३७ मजुरांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार देण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेंतर्गतची कामे करून घेण्यासाठी गावपातळीवर एका ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. मजुरांचे जॉबकॉर्ड भरून घेणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, बँक खाते क्रमांक उघडून देणे तसेच रोजगार हमीच्या कामांना सहकार्य करणे या सर्व कामांची जबाबदारी या सेवकांवर सोपविण्यात आली आहे. कामाची मागणी केल्यानंतर जॉबकार्डधारक मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या कामाचा मोबदला मजुरांच्या बँक किंवा पोस्ट खाते क्रमांकावर दिला जातो. २०१३-१४ या वर्षात ७२.५२ लाख मजुरांनी जॉब कार्डची मागणी नोंदविली होती. या सर्व मजुरांना जॉबकार्ड देऊन, त्यापैकी ४६.७० लाख मजुरांची बँक खाती उघडण्यात आली होती. २०१४-१५ या वर्षात जॉब कार्डधारक मजुरांची संख्या वाढली; मात्र त्यातुलनेत बँक खातेधारक मजुरांची संख्या घटली आहे.
या वर्षात ७३ लाख ४२ हजार ७४० जॉब कार्डधारक मजुरांची नोंदणी असून, २५ लाख ८६ हजार ८५२ मजुरांचे बँक खात क्रमांक उघडण्यात आले नाहीत. मजुरांची मजुरी बँक किंवा पोस्ट खाते क्रमांकावर टाकण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिलेले असतानाही, अनेक मजुरांकडे बँक खाते क्रमांक उपलब्ध नाहीत. परिणामी, मजुरी वितरणात अडचणी निर्माण होत आहे.
२६ लाख मजुरांना अजूनही बँक खात्याची प्रतीक्षा!
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यातील ७३ लाख ४२ हजार ७४० जॉब कार्डधारक मजुरांपैकी २५ लाख ८६ हजार ८५२ मजुरांना बँक खाते क्रमांकाची प्रतीक्षा आहे
By admin | Published: October 1, 2015 10:08 PM2015-10-01T22:08:15+5:302015-10-01T22:08:15+5:30