संतोष मिठारी
कोल्हापूर/शिरोली : लॉकडाउनमुळे बंद असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटे-मोठे २६१ उद्योग सुरू झाले आहेत. त्याद्वारे रोजगार सुरू झाल्याने ४१६६ कामगारांना दिलासा मिळाला आहे. उद्योग सुरू झाल्याने जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. उद्योग सुरू होण्याची कोल्हापूरमधील संख्या ही पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून औद्योगिक महामंडळाच्या संकेतस्थळावर मंगळवार दुपारपर्यंत १३३४ उद्योजकांनी परवानगीसाठी आॅनलाइन अर्ज केला असून, त्यातील ६६७ जणांना परवानगी मिळाली आहे. त्यापैकी शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, चंदगड आदी परिसरांतील औद्योगिक वसाहतींतील २६१ उद्योग हे ४१६६ कामगारांच्या माध्यमातून सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत आहे.
लॉकडाउनमुळे गेल्या ३८ दिवसांपासून उद्योग क्षेत्राची चक्रे थांबली. शासनाच्या परवानगीने आता टप्प्याटप्प्याने उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अर्थकारणाला गती मिळणार आहे.
>सुरू झालेले उद्योग
जीवनावश्यक वस्तू उत्पादनांच्या १३५ कारखान्यांसह मोठ्या फाउण्ड्री उद्योगातील मशीनशॉप, फेटलिंग शॉप, पॅकिंग युनिट, पेंटिंग शॉप, सूतगिरणी असे उद्योग सुरू झाले आहेत. कच्चा माल आणि कामगारांच्या उपस्थितीनुसार बहुतांश उद्योजक त्यांचे कारखाने सुरू करीत आहेत.