नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर मे, २०२० मध्ये विमान वाहतूक पुन्हा सुरू झाल्यापासून १ ऑगस्ट हा भारताच्या विमान वाहतुकीमधील सर्वाधिक गर्दीचा दिवस ठरला आहे. या एकाच दिवसामध्ये २ लाख ६९ हजार ७१३ व्यक्तींनी विमानप्रवास केल्याचे आकडेवारीमधून स्पष्ट झाले आहे.
देशातील दुसऱ्या लाटेचा प्रकोप आता बराच कमी झाला असून जनजीवन पूर्ववत होऊ लागल्याचे हे संकेत असल्याचे मानले जात आहे. १ ऑगस्ट रोजी देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये २०६५ विमानांनी उड्डाण केले, तर २०२२ विमाने ही विविध विमानतळांवर उतरली आहेत. यामध्ये एकूण ४०८७ विमानांचा वापर झाला आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी विमानतळांवरील फूटफॉल हा ५ लाख ३३ हजार ३७ एवढा आला आहे.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे. रविवारी १२५ विमानांचे आगमन झाले असून १४८ विमाने रवाना झाली आहेत. यामध्ये एकूण २७३ विमानांचा वापर करण्यात आला. या सेवांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जाणाऱ्यांपेक्षा ४३७० ने अधिक राहिली. आंतरराष्ट्रीय सेवेमधून १३,९५७ प्रवासी हे रवाना झाले असून येणाऱ्या प्रवाशांची संख्या १८,३२७ आहे. या प्रवाशांचा एअरपोर्ट फूटफॉल ३२,२८४ एवढा राहिला आहे.
मे, २०२० मध्ये कोरोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर एकाच दिवसामध्ये एवढ्या विमानांची ये-जा तसेच प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता १ ऑगस्ट हा सर्वात गर्दीचा दिवस असल्याचे दिसून आले आहे.
काय आहे फूटफाॅल?
विमानतळावर किती व्यक्ती आहेत याचे मोजमाप करण्यासाठी फूटफाॅल ही यंत्रणा वापरली जाते. या यंत्रणेद्वारे विमानतळावर वावरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पावलानुसार मोजमाप केले जाते. काही ठिकाणी मोबाइलच्या रेंजमधुन मिळणारी माहिती एकत्र करूनही असे मोजमाप केले जाते.