Join us  

BSNLशी जोडले गेले २७ लाख नवे ग्राहक; तगडा फायदा करून देऊ शकतात 'हे' शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:57 PM

BSNL Related Stock: जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यापासून बीएसएनएलच्या सिमची मागणी वाढली आहे. या खासगी कंपन्यांनी ११ ते २५ टक्क्यांनी दरवाढ केली आहे.

BSNL Related Stock: जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्यापासून बीएसएनएलच्या सिमची मागणी वाढली आहे. या खासगी कंपन्यांनी ११ ते २५ टक्क्यांनी दरवाढ केली आहे. दुसरीकडे सरकारी कंपनी बीएसएनएलचे दर स्थिर आहेत. याचा फायदा बीएसएनएललाही मिळत आहे. बीएसएनएलनं २७ लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएलकडे नवे ग्राहक आल्यानं या ४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते.

तेजस नेटवर्क (Tejas Network Ltd)

बीएसएनएलनं कंपनीला आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. मे महिन्यात बीएसएनएलनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नेतृत्वाखालील कन्सोर्टियमला ४जी नेटवर्क उभारण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचं कंत्राट दिलं . तेजस नेटवर्क हा या कन्सोर्टियमचा एक भाग आहे. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १२९५.२० रुपयांवर होता. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाची शेवटची तिमाहीही कंपनीसाठी जबरदस्त राहिली आहे. या कालावधीत कंपनीला १.४७ अब्ज रुपयांचा नफा झाला आहे. जे वार्षिक आधारापेक्षा १६८ टक्के अधिक आहे.

HFCL 

हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेडला देशभरातील ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी ११.३ अब्ज रुपयांचं काम देण्यात आलं आहे. देशभरात ब्रॉडबँडची वाढती मागणी पाहता या कंपनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सची किंमत १२१ रुपयांच्या पातळीवर होती.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS Share price)

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि बीएसएनएलनं १००० गावांमध्ये ४जी सेवा आणण्यासाठी १५,००० कोटी रुपयांचा करार केला आहे. दोन्ही कंपन्या मिळून गावात हायस्पीड इंटरनेट पुरवणार आहेत. तसेच जिओ आणि एअरटेलसाठी चांगला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आशियातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीचा शेअर शुक्रवारी ४३८९.९५ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एमटीएनएल (MTNL)

एमटीएनएलचे कामकाज बीएसएनएलला देण्याचा सरकारचा विचार असल्याचा रिपोर्ट समोर येत आहे. रिस्ट्रक्चरिंगचा नवा मार्ग म्हणून याकडे पाहिलं जात आहे. या चर्चेमुळे एमटीएनएलच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. ज्यानंतर कंपनीचा शेअर बीएसईमध्ये ९७.०८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :बीएसएनएलशेअर बाजार