Join us  

१३ बँकांना २७ कोटी दंड

By admin | Published: July 29, 2016 5:01 AM

विदेशी चलन नियमन कायदा (फेमा) आणि ग्राहक ओळख नियम (केवायसी) यांच्याकडे डोळेझाक करणाऱ्या १३ सरकारी आणि खाजगी बँकांना रिझर्व्ह

मुंबई : विदेशी चलन नियमन कायदा (फेमा) आणि ग्राहक ओळख नियम (केवायसी) यांच्याकडे डोळेझाक करणाऱ्या १३ सरकारी आणि खाजगी बँकांना रिझर्व्ह बँकेने २७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड झालेल्या बँकांत पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. याशिवाय स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) आणि आयसीआयसीआय बँकेसह आठ बँकांना नियमांचे पालन करण्याबाबत कठोर इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. सरकारी बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अ‍ॅडव्हॉन्स इम्पोर्ट रेमिटन्सेसची तपासणी केली होती. त्यात दोषी आढळलेल्या १३ बँकांवर आता कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांची योग्य प्रकारे ओळख पटविण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचेही या बँकांनी उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ओबीसी, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, एसबीआय आणि युनियन बँक आॅफ इंडिया यांना फेमा आणि केवायसी नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक इशारा देण्यात आला आहे. नियमांच्या अंमलबजावणीची व्यवस्था करा तसेच तिचा वेळोवेळी आढावा घ्या, असे या बँकांना बजाविण्यात आले आहे. ही कारवाई नियमांच्या पायमल्ली केल्याबद्दल करण्यात आली आहे. दंड ठोठावला म्हणून या बँकांचा कुठलाही व्यवहार अथवा ग्राहकांसोबतचा करार वैध होत नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. या बँकांनी खाते उघडतानाच नियमांची पायमल्ली केली आहे. तसेच नंतर खात्यांचे नियमन करतानाही नियम मोडले गेले आहेत. त्यातून फेमासह अन्य तरतुदींचा भंग झाला आहे. (प्रतिनिधी)दंड ठोठावलेल्या बँकादंड ठोठावलेल्या बँका आणि दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे- बँक आॅफ बडोदा (५ कोटी), पंजाब नॅशनल बँक (३ कोटी), सिंडिकेट बँक (३ कोटी), युको बँक (२ कोटी), एचडीएफसी बँक (२ कोटी), अलाहाबाद बँक (२ कोटी), कॅनरा बँक (२ कोटी), इंडसइंड बँक (२ कोटी), एसबीबीएजे (२ कोटी), बँक आॅफ इंडिया (१ कोटी), कॉर्पोरेशन बँक (१ कोटी), आरबीएल बँक (१ कोटी), एसबीएम (१ कोटी).