मुंबई : इंडियन ऑइल कंपनी देशभरात २७ हजार पेट्रोल पंप उभे करणार आहे. यासाठी कंपनीने ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. मुख्य म्हणजे, स्वत:ची जमीन नसतानाही पंप चालविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. पण यासंबंधी कंपनीने कुठलीही एजन्सी, संस्था किंवा मध्यस्थ व्यक्तीची नियुक्ती केलेली नाही.भारत इंधन आयात करणारा जगातील तिसरा मोठा देश आहे. भारतीयांचे दरडोई उत्पन्न झपाट्याने वाढत आहे. यामुळे येत्या १५ ते २० वर्षांत देशाला मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज असेल. हे पाहता कंपनी नवीन पेट्रोल पंप उभे करणार आहे.पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत सोपी केली आहे. अर्ज केल्यानंतर फक्त निवड झालेल्यांना आवश्यक दस्तावेज कंपनीकडे जमा करावे लागतील. पंपासाठी जवळ जागा नसतानाही अर्ज करता येणार आहे. कंपनीकडे जमीन उपलब्ध झाली की त्यानुसार अशा अर्जदारांची निवड केली जाईल. अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण व ६० वर्षे वयाखालील असावा, अशी अट असेल. याखेरीज कंपनीने काही पेट्रोल पंपांवर या अर्जासंबंधीचे सुविधा केंद्रही उभे केले आहे.
इंडियन ऑइल उभारणार २७ हजार पेट्रोल पंप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:46 AM