Zerodha Fraud News : ब्रोकिंग फर्म असलेल्या झिरोदा लिमिटेडमध्ये (Zerodha) २.७५ कोटी रुपयांचा एक मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बोगस डीमॅट खाती (Demat Account) आणि ट्रेडिंग खाती सुरू करून कंपनीला गंडवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन झिरोदाने केला आहे.
झिरोदामध्ये घोटाळा करणारा कोण?
सीआयडी क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार झिरोदा लिमिटेडकडून सूरतमधील किशन सोनी याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार, किशन झिरोदाशी ग्राहक म्हणून जोडला गेला होता. नंतर तो स्टॉक ब्रोकर बनला.
स्टॉक ब्रोकर म्हणून किशनला कमिशन मिळत होते. नंतर अशी माहिती समोर आली की किशनने सुरू केलेली सर्व खाती बोगस आहेत. त्याने बोगस डीमॅट आणि ट्रेडिंग खाती बनवून कंपनीला फसवले.
किशन २०१८ मध्ये ग्राहक म्हणून जोडला गेला होता. २०२० मध्ये तो ब्रोकर बनला होता. या काळात त्याने ४३२ खाती सुरू केली. त्याबद्दल त्याला ५५ लाख रुपये कमिशन मिळाले होते.
झिरोदा फ्रॉड कसा उघडकीस आला?
ब्रोकिंग फर्म झिरोदामध्ये सुरू असलेला हा घोटाळा पडताळणीनंतर समोर आला. ४३२ पैकी ३३२ खात्यांमध्ये पैसे होते. पण, त्या खातेधारकांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी असे कोणतेही खाते उघडले नसल्याचे सांगितले. झिरोदा खडबडून जागी झाली.
या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तळाशी गेल्यानंतर असे आढळून आले की, किशनने ही खाती सुरू करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. या खात्यातील व्यवहारांसाठी त्याने बिहारमधील १४ लोकांना कामावर ठेवले होते.
झिरोदाचे किती कोटीचे नुकसान झाले?
किशन आणि त्याच्या टीम कंपनीला गंडवत होती. जास्त ब्रोकरेज मिळवण्यासाठी या खात्यातून छोटे व्यवहार केले जात होते. ऑडिटमधून असे समोर आले की, कंपनीला या घोटाळ्यामुळे २.२० कोटी रुपये टॅक्स आणि जीएसटीची चोरी झाली आहे. हा घोटाळा तब्बल २ कोटी ७५ लाख इतका आहे.