नागपूर : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा नागपूर विभागातील हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमधील २७,५४१ शेतकऱ्यांवर असलेले सावकारी कर्ज शासनाकडून माफ करण्यात आले आहे. योजना जाहीर झाल्यापासून ते १५ मार्चपर्यंत जिल्हास्तरीय समितीने ३३ कोटींहूनच्या अधिक रकमेचे प्रस्ताव मान्य केले आहेत. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत कर्जमाफी योजनेंतर्गत पूर्व विदर्भातील सावकारी संबंधिचा तपशिल मिळविला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार योजना सुरू झाल्यापासून ते १५ मार्चपर्यंतच्या कालावधीत नागपूर विभागातील २७,५४१ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या ६ जिल्ह्यांतील ३,०१५ गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांचे ३३ कोटी ७७ लाख ७२ हजारांचे कर्ज माफ करण्यात आले. यात २७ कोटी ९८ लाख २८ हजार रुपयांचे मुद्दल व ५ कोटी ७९ लाख ४४ हजारांच्या व्याजाचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या बदलात सावकारांकडे मोठ्या प्रमाणावर वस्तू गहाण ठेवल्या होत्या. २३ मार्च २०१६ पर्यंत कर्जमाफी योजनेंतर्गत यातील १४ हजार ६४७ शेतकऱ्यांना गहाण वस्तू परत मिळाल्या आहेत.