नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) २८ टक्के कर कक्षेतील वस्तू व सेवांच्या यादीची छाटणी करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. असे झाल्यास २८ टक्के कर असलेल्या वस्तूंची संख्या कमी होईल. मात्र, जीएसटीमधून येणारा महसूल आधीच्या उत्पन्नाच्या बरोबरीत आल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल, असे जेटली म्हणाले.देशभर १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटी कर व्यवस्थेत १,२००पेक्षा जास्त वस्तू व सेवांवर ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असा चार टप्प्यांत कर लावण्यात आला आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी येणाºया जितका मिळत होता, तितकाच महसूल मिळावा अशा पद्धतीने चार टप्प्यांतील करांची विभागणी करण्यात आली आहे.येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेत जेटली यांनी सांगितले की, खरे म्हणजे काही वस्तूंवर २८ टक्के कर असायलाच नको होता. त्यामुळेच जीएसटी परिषदेने गेल्या तीन ते चार बैठकांत १००पेक्षा जास्त वस्तूंवरील कर कमी केला आहे. २८ टक्के कर असलेल्या वस्तू १८ टक्के कराच्या कक्षेत आणल्या, तर १८ टक्के कर असलेल्या वस्तू १२ टक्के कराच्या कक्षेत आणल्या.जेटली म्हणाले की, आम्ही हळूहळू कर कमी करीत आहोत. महसूल सामान्य झाला की, करकपात करायची, असे धोरण आहे. त्यानुसार आतापर्यंत निर्णय घेतले गेले आहेत. पुढेही हेच धोरण कायम राहील.जीएसटी परिषदेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी होत आहे. या बैठकीत काही वस्तूंवरील करात कपात केली जाऊ शकते. हाताने बनविलेले फर्निचर, प्लास्टीक उत्पादने, शांपूसारखी दैनंदिन वापरातील उत्पादने यांचा त्यात समावेश आहे.
२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:25 AM