नवी दिल्ली : आधुनिक विज्ञान, संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान, मोबाइल इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे सध्याचे चित्र पुरते पालटून गेले आहे. घराघरात डेटा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे. या क्षेत्राची सध्या होणारी एकूण वाढ पाहता येत्या पाच वर्षांत डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी वर्तवला आहे.
डाटा सायन्समध्ये नाविन्यता आणि कल्पकतेला असलेला वाव आणि देशात तसेच परदेशात असलेल्या अनेक संधी यामुळे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पालकही या पर्यायांविषयी अधिक माहिती घेताना दिसत आहेत. (वृत्तसंस्था)
सतत वाढती लोकप्रियता
नावीन्यता आणि कल्पकतेला वाव देणारे डेटा विज्ञान जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातील तरुणवर्गात खूप लोकप्रिय आहे. या क्षेत्रात चांगली स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. असे शिक्षण देणारी अनेक केंद्र देशात आकार घेत आहेत.
१.३९ अरब डॉलर्सची उलाढाल
आयटी शिक्षण क्षेत्रातील संस्था इमार्टिकस आणि हैदराबाद येथील आयटी क्षेत्रातील पोर्टल ॲनालिटिक्स इनसाइट यांनी केलेल्या संयुक्त अध्ययनातून ही माहिती समोर आली आहे. संस्थांनी जारी केलेल्या अहवालानुसार देशातील डेटा सायन्स क्षेत्रातील सध्याची उलाढाल २०४२ कोटी डॉलर्स इतकी आहे. २०२८ पर्यंत म्हणजेच पुढील पाच वर्षांत ५७.५ टक्के वाढून ही उलाढाल १.३९ अरब डॉलर्सच्या घरात पोहोचेल.
ऑनलाइन शिक्षण ५८.८२ टक्क्यांनी वाढणार
२०२७ मध्ये ही उलाढाल ५६.७३ टक्क्यांनी वाढून ८५.७५ कोटी डॉलर्सच्या घरात पोहचू शकते. या काळात ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील उलाढाल ५८.८२ टक्क्यांनी वाढून ५३.५६ कोटी डॉलर्सच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रात होणारी एकूण गुंतवणूक आणि वाढता पसारा पाहता येत्या पाच वर्षांत नवे रोजगार निर्माण वेग ५७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाच वर्षांत तब्बल ३ लाख ३० हजार तरुणांच्या नोकऱ्या मिळण्याचा अंदाज आहे.