प्रसिद्ध उद्योगपती आणि गोदरेज अॅग्रोवेटचे चेअरमन नादिर गोदरेज यांनी मुंबईतील मलबार हिल भागात ३ अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदरेज यांनी या डीलसाठी १८० कोटी रुपये दिले आहेत. या अपार्टमेंटचं एकूण क्षेत्रफळ १३ हजार ८३१ चौरस फूट आहे. प्रत्येक चौरस फुटासाठी १ लाख १३ हजार रुपये देण्यात आले आहेत. ही अपार्टमेंट्स रुपारेल हाऊस कॉम्प्लेक्समध्ये आहेत. ही एक पॉश सोसायटी आहे.
एका अपार्टमेंटचा कार्पेट एरिया ४६१० चौरस फूट आहे. सहाव्या, सातव्या आणि आठव्या मजल्यावर हे अपार्टमेंट्स आहेत. १२ जून रोजी मालमत्तेची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी साडेतीन कोटी रुपये स्टँप ड्युटी भरण्यात आली आहे. या कराराबाबत गोदरेज यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मलबार हिलमध्ये अनेक उच्चभ्रू लोकांची घरं आहेत.
राकेश झुनझुनवाला यांचं घर
गेल्या २ वर्षांत या भागाचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्यात आला आहे. अनेक बड्या कंपन्या येथे पुनर्विकास प्रकल्पांवर काम करत आहेत. दिवंगत ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनीही येथील एका इमारतीतील जवळपास सर्व अपार्टमेंट्स खरेदी केले. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्र आपल्या घरातून दिसण्यात कोणतीही बाधा येऊ नये अशी त्यांची इच्छा होती असं म्हटलं जात आहे.
गेल्या वर्षी मुकुल अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या परम कॅपिटल या आघाडीच्या भांडवली बाजार व्यापार आणि गुंतवणूक कंपनीच्या संचालक आशा मुकुल अग्रवाल यांनी मुंबईतील लोढा मलबार येथे २६३ कोटी रुपयांना तीन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. मुंबईतील लोढा मलबार, वाळकेश्वर रोड आणि मलबार हिल येथे ही अपार्टमेंट्स आहेत.