लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०१३ ते २०२३ या १० वर्षांच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्राने ३ कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे. २०१३ मध्ये या क्षेत्रातील एकूण रोजगार ४ कोटी होता. २०२३ मध्ये तो ७.१ कोटी झाला. ॲनारॉक आणि नरेडको या संस्थांनी जारी केलेल्या अहवालातून हे समोर आले आहे. देशातील प्रमुख ७ शहरांत २०१३ ते २०२३ या काळात २८.२७ लाख घरांची विक्री झाली. या काळात २९.३२ लाख नवी घरे लाँच करण्यात आली. मागणी वाढल्याने किमती २५ ते ६० टक्के वाढल्या.
अहवालानुसार, देशाच्या एकूण रोजगारात वास्तव संपदा क्षेत्राचा वाटा १८ टक्के आहे. एका दशकात देशाची अर्थव्यवस्था सर्वोच्च ५ देशांच्या यादीत समाविष्ट झाली.
४.३५ लाख घरांची निर्मिती
२०२३ पर्यंत ४.३५ लाख घरांची निर्मिती पूर्ण झाली. २०२४ मध्ये ५.३१ लाख घरे निर्माण होण्याची शक्यता आहे. रेरामुळे गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यात मदत झाली आहे.
‘स्वामी फंडा’तून
२६ हजार घरे
२०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘स्पेशल विंडो फॉर ॲफोर्डेबल अँड मिड इन्कम हाउसिंग (स्वामी फंड) योजनेत २०२३ पर्यंत २६ हजार घरे पूर्ण झाली. आगामी ३ वर्षांत ८० हजार घरे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
८३ लाख कोटींचा होणार गृहनिर्माण उद्योग
संस्थांनी जारी केकेल्या अहवालात म्हटले आहे की, २०३० पर्यंत गृहनिर्माण उद्योग १ लाख कोटी डॉलर म्हणजेच ८३ लाख कोटी रुपयांचा होईल. जीडीपीतील त्याचे योगदान १३ टक्के असेल, असेही म्हटले आहे.