नवी दिल्ली : भारताने २0२२ पर्यंत सौर व पवनऊर्जा क्षेत्रात १७५ गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यातून ३ लाख कामगारांना रोजगार मिळेल. संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटने’ने (आयएलओ) जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
जागतिक रोजगारांबाबत जारी केलेल्या वार्षिक अहवालात आयएलओने म्हटले आहे की, पर्यावरणीय बदलाविरुद्ध लढण्यासाठी सौर आणि पवनऊर्जा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातून रोजगारही निर्माण होईल. पारंपरिक प्रकल्प बंद केल्यामुळे जेवढे रोजगार गमावले जातील, त्यापेक्षा अधिक रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतील. २0३0 पर्यंत जगात २४ दशलक्ष नवी पदे निर्माण केली जातील. मात्र, हे घडून येण्यासाठी हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारी योग्य धोरणे आखली जाणे आवश्यक आहे.
‘वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलूक २0१८ : ग्रिनिंग विथ जॉब’ या अहवालात आयएलओने म्हटले आहे की, भारताने २0२२पर्यंत नवकरणीय स्रोतांद्वारे १७५ गिगावॅट ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
>वाढती गरज
सौर आणि पवनऊर्जा क्षेत्रातील कंपन्या, विकासक आणि उत्पादक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताला हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ३ लाख कामगार लागतील. उद्दिष्टपूर्तीसाठी भूस्थापित सौरप्रकल्प, छतावरील सौरप्रकल्प आणि पवनऊर्जा प्रकल्प यातील कामगारांची संख्या भारताला सातत्याने वाढवावी लागणार आहे.
सौर, पवनऊर्जा क्षेत्रात मिळणार ३ लाख नोकऱ्या
भारताने २0२२ पर्यंत सौर व पवनऊर्जा क्षेत्रात १७५ गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यातून ३ लाख कामगारांना रोजगार मिळेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:08 AM2018-05-16T00:08:43+5:302018-05-16T00:08:43+5:30