Join us

PPF मधील ३ पर्याय तुमचं भविष्य बदलतील! ₹१०००, ₹३०००, ₹५००० वर किती मिळणार रिटर्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 1:44 PM

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. ही योजना बहुतांश भारतीयांच्या पसंतीची आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. ही योजना बहुतांश भारतीयांच्या पसंतीची आहे. याचं कारण म्हणजे त्यावर उपलब्ध असलेले फायदे. मग ती व्याज असो वा करमुक्त गुंतवणूक किंवा मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम. हे प्रत्येक बाबतीत गुंतवणूकीचं एक उत्कृष्ट साधन मानलं जातं. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. पण, १५ वर्षांनंतरही अनेक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला असे ३ फायदे सांगणार आहोत, ज्यानंतर तुम्हीही यात गुंतवणूकीचा विचार कराल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही त्यात मुदतपूर्तीनंतर पैसे गुंतवले किंवा नाही, व्याज मिळत राहील. पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर तुमच्याकडे ३ पर्याय आहेत. यापैकी कोणताही पर्याय निवडून तुम्ही तुमचे पैसे आणखी वाढवू शकता.मॅच्युरिटीवर पैसे काढणंपीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीवर, तुम्ही त्यात जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारं व्याज काढू शकता. हा पहिला पर्याय आहे. खातं बंद झाल्याच्या स्थितीत तुमचे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारे पैसे आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असेल. तसंच, तुम्ही किती वर्षे गुंतवणूक केली आहे यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

१५ वर्षांनंतरही सुरू ठेवू शकतादुसरा फायदा किंवा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या खात्याचा कालावधी मॅच्युरिटीनंतर वाढवू शकता. यामध्ये तुम्हाला ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढ करता येईल. परंतु, हे लक्षात ठेवा की तुम्हाला पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटीच्या १ वर्ष आधी मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल. मात्र, मुदतवाढीदरम्यान तुम्ही पैसे काढू शकता. यामध्ये प्री-मॅच्युअर पैसे काढण्याचे नियम लागू होत नाहीत.विना गुंतवणूक अकाऊंट सुरू राहणारPPF खात्याचा तिसरा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही वरील दोन पर्याय निवडले नसले तरी, तुमचं खातं मॅच्युरिटीनंतरही चालू राहील. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलीच पाहिजे असंही नाही. मॅच्युरिटी आपोआप त्याचा कालावधी ५ वर्षांनी वाढेल. चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात व्याज मिळत राहील. येथे ५-५ वर्षांची मुदतवाढ देखील लागू होऊ शकते.किती गुंतवणूकीवर किती रिटर्न?सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. जर तुम्ही या व्याजदरासह १५ किंवा २० वर्ष गुंतवणूक केली तर तुम्ही खूप मोठा फंड तयार करू शकता.

जर तुम्ही महिन्याला १ हजार रुपये गुंतवत असाल तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ३.२५ लाख आणि २० वर्षांनंतर ५.३२ लाख रुपये मिळतील. जर तुम्ही महिन्याला २ हजार गुंतवले तर तुम्हाला १५ वर्षांनंतर ६.५० लाख, २० वर्षांनंतर १०.६५ लाख, तसंच महिन्याला ३ हजार गुंतवल्यास १५ आणि २० वर्षाला अनुक्रमे ९.७६ लाख रुपये आणि १५.९७ लाख रुपयांचा निधी, तर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवल्या १५ वर्षांनी १६.२७ लाख आणि २० वर्षांनी २६.६३ लाख रुपयांचा निधी मिळेल. ही रक्कम अंदाज म्हणून दिली आहे. पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात दर ३ महिन्यांनी बदल होत असतात. या रकमेमध्येही बदल होऊ शकतो.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक