लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मार्च महिना उजाडल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या ११ दिवसांत सोने तब्बल ३ हजारांहून अधिक रुपयांना महागले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार सोमवारी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८० रुपयांनी वाढून ६५,६३५ रुपयांवर पोहोचली आहे.
या आधी ७ मार्च रोजी सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. १ मार्च रोजी सोन्याची किंमत प्रतितोळा ६२,५९२ रुपये इतकी होती. ११ दिवसांमध्ये किमतीत ३,०४३ रुपयांनी वाढ झाली आहे. या काळात चांदीचा दर प्रतिकिलो ६९,९७७ रुपयांवरून वाढून ७२,५३९ रुपयांवर पोहोचले आहेत.
वर्षभरात सोन्याचा दर प्रतितोळा ८,३७९ रुपयांनी वाढले. येणाऱ्या दिवसांत सोन्याच्या दरात अशीच तेजी दिसून येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने ७० हजारांच्या घरात पोहोचू शकते.
सोने खरेदीचा चीनचा धडाका
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार सोन्याच्या वाढीचे खरे कारण चीनकडून सुरू असलेली जोरदार खरेदी हे आहे. चीनची सेंट्रल बँक आपल्याजवळ असलेला सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहे. या देशाजवळ असलेल्या सोन्याच्या साठ्यात सलग १५ व्या महिन्यात वाढ नोंदविली गेली आहे.
सध्या चीनजवळ असलेला सोन्याचा एकूण साठा २,२४५ टनांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर २०२२ पासून चीनमधील सोन्याचा साठा तब्बल ३०० टनांनी वाढला आहे. सेंट्रल बँक ऑफ चायनासोबत या देशातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करीत आहेत.
का वाढत आहेत दर?
- २०२४ मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत - लगीनसराईमुळे सोन्याला वाढलेली मागणी - डॉलर इंडेक्समध्ये दिसत असलेली कमजोरी - जगभरातील केंद्रीय बँकांचा खरेदीचा धडाका
२०२३ च्या सुरुवातीला सोने प्रतितोळा ५४,८६७ रुपयांवर होते. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ते १६ टक्के वाढून ६३,२४६ रुपायंवर पोहोचले.