जमशेदपूर : येथील आदित्यपूर औद्योगिक वसाहतीतील पोलाद क्षेत्राशी संबंधित ३0 कंपन्या बंद पडल्या आहेत. आदित्यपूर औद्योगिक वसाहतीत वाहन उद्योगाची उपउत्पादने बनविली जातात. टाटा मोटर्सला प्रामुख्याने ही उत्पादने पुरविली जातात. वाहन क्षेत्रातील मंदीमुळे टाटा मोटर्सचे काम मंदावल्याने सहायक उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या बंद पडत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सुमारे डझनभर कंपन्या गुरुवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. वाहनविक्री घटल्यामुळे टाटा मोटर्सने मागील एका महिन्यात चार वेळा काम बंद केले. यावेळी गुरुवारी ते शनिवार काम बंद ठेवले. रविवारी सुट्टीच असल्यामुळे कारखाना बंदच असतो. हंगामी एक हजार कामगारांना १२ दिवसांची सुट्टी दिली असून, त्यांना १२ आॅगस्टलाच कामावर बोलावले आहे. स्थायी कर्मचाऱ्यांनाही ५ आॅगस्ट रोजी कामावर बोलावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून टाटा मोटर्सकडे महिन्यातील फक्त १५ दिवसच काम आहे. जुलैमध्ये कंपनीच्या वाहनांची विक्री ४0 टक्क्यांनी घटली आहे.
मारुतीची कामगारकपात
भारतातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने हंगामी कामगारांच्या संख्येत ६ टक्के कपात केली आहे. मारुती सुझुकीने म्हटले की, यंदा दशकातील सर्वांत मोठ्या मंदीचा सामना वाहन उद्योगास करावा लागत आहे. ३0 जूनला संपलेल्या ६ महिन्यांत कंपनीकडे सरासरी १८,८४५ हंगामी कामगार होते. मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत कामगारांची ही संख्या ६ टक्क्यांनी कमी आहे.
अशोक लेलँडकडून खर्चात कपात
व्यवसायिक वाहन उत्पादक कंपनी अशोक लेलँडनेही खर्चात ५00 कोटींची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीएफओ गोपाल महादेवन यांनी सांगितले की, प्रशासन, उत्पादन, प्रवास, संपर्क आणि सल्ला अशा विविध क्षेत्रांतील खर्चात कपात करण्यात येत आहे. कामगारकपातीच्या मुद्द्यावरही विचार केला जात आहे.
मंदीचं सावट? जमशेदपूरमधील पोलाद क्षेत्रातील 30 कंपन्या बंद
वाहनक्षेत्रात मंदी; काम घटल्याने सहायक उत्पादने बनविणारे उद्योग संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:11 AM2019-08-04T03:11:45+5:302019-08-04T06:31:51+5:30