Join us

३० कोटींची कमाई, १५० कोटींचा खर्च; घेतलं मोठं कर्ज; अशी जमिनीवर आली BYJU's

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 10:06 AM

एक काळ असा होता की टीम इंडियाच्या जर्सीवर बायजूसचा लोगो असायचा. शाहरुख खानसारखा सुपरस्टार कंपनीची जाहिरात करायचा.

BYJU’s Story: बायजूस, हे नाव तुम्ही कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. प्रथम प्रसिद्धीच्या काळात आणि आता संकटाच्या काळात. गेल्या दीड वर्षात, एडटेक प्लॅटफॉर्म Byju's बद्दल अनेक नकारात्मक बातम्या आल्या आहेत. आता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली आहे की बॉस बायजू रवींद्रन यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्यांचे घर गहाण ठेवावं लागलं आहे. असे काय झालं की एवढी मोठी कंपनी हळूहळू कोसळू लागली?

एक काळ असा होता की टीम इंडियाच्या जर्सीवर बायजूसचा लोगो असायचा. शाहरुख खानसारखा सुपरस्टार कंपनीची जाहिरात करायचा. आता बायजू सारखी कंपनी रसातळाला कशी गेली हा प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला दीड वर्ष मागे जावं लागेल, जिथून बायजूच्या घसरणीला सुरुवात झाली.

कशी झाली BYJU’s ची सुरुवातबायजूसच्या संकल्पनेमागे बाजू रवींद्रन हे होते. ट्यूशन व्यवसायात प्रचंड यश मिळाल्यानंतर, बायजू रवींद्रन यांनी नोकरी सोडली आणि कोचिंग व्यवसायात प्रवेश केला. २००७ मध्ये, शिक्षक म्हणून त्यांची लोकप्रियता शिखरावर होती. या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी बायजू रवींद्रन यांनी २०११ मध्ये थिंक अँड लर्न नावाची कंपनी स्थापन केली आणि बायजूसचं ऑनलाइन व्हर्जन सुरू केलं.

बायजू रवींद्रन यांचा हा प्रयोग यशस्वी झाला कारण त्याच्या ऑनलाइन क्लासेसचे व्हिडीओ लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. यानंतर, २०१५ मध्ये, त्यांनी Byju चे अॅप लॉन्च केले, जे त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरले. यासह कंपनी एडटेक क्षेत्रातील देशातील नंबर १ कंपनी बनली. कोरोना महासाथीच्या काळात लॉकडाऊन लागू झाला तेव्हा शाळा, महाविद्यालये, कोचिंग सेंटर सर्व बंद होते. हा काळ बायजूसाठी वरदान ठरला आणि कंपनीच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली.

जून २०२० मध्ये, Byju's जगातील सर्वोच्च मूल्यवान एडटेक स्टार्टअप बनलं. यावेळी कंपनीचे मूल्यांकन ८५ हजार कोटींच्या आसपास पोहोचले होते. या काळात बायजूसनं आपला व्यवसाय झपाट्यानं वाढवला आणि अनेक स्टार्टअप सुरू केले. कंपनीने आकाश इन्स्टिट्यूट, आयरोबोत ट्युटर, हॅशलर्न, व्हाईट हॅट ज्युनिअर आणि टॉपर सारख्या अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं. यासाठी बायजूसनं १.२ अब्ज डॉलर्सचं कर्जही घेतलं.

अशी लागली उतरती कळाकोरोनाच्या काळात बायजूनं कमालीची प्रगती साधली, पण महासाथ संपल्यानंतर बायजूसला उतरती कळा लागल्याचं दिसून आलं. खरं तर, कोविडचे निर्बंध हटवल्यानंतर, ऑनलाइन कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांची आवड कमी होऊ लागली. त्यामुळे बायजूसच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कंपनीचें उत्पन्न घटलं पण मोठ्या गुंतवणुकीमुळे खर्च तसाच राहिला. एनबीटीच्या रिपोर्टनुसार, अशी वेळ आली जेव्हा कंपनीचं मासिक उत्पन्न ३० कोटी रुपये होतं तर खर्च १५० कोटी रुपये होता. अशा स्थितीत बायजू यांच्यावर कर्ज फेडण्याचा बोजा वाढला.

मूल्यांकन कमीएके काळी देशातील आणि जगातील सर्वात मौल्यवान टेक स्टार्टअप असलेल्या बायजूसचं मूल्यांकन कमी केल्यानंतर, तसंच फंडिंग संपल्यावर गंभीर स्थिती निर्माण झाली. २०२३ मध्ये, गुंतवणूक फर्म BlackRock नं कंपनीचे मूल्यांकन २२ बिलियन डॉलर्स वरून ८.४ बिलियन डॉलर्सपर्यंत कमी केलं. त्याच वेळी, जूनमध्ये फर्मनं कंपनीचं मूल्यांकन ५.१ बिलियन डॉलर्स इतकं केलं. तर दुसरीकडे प्रोसस या कंपनीनं बायजूसचं मूल्यांकन ३ बिलियन डॉलर्स इतकं कमी केलं.

कर्जामुळे स्थिती बिकटकर्जामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खालावत गेली. जेव्हा कंपनीनं सप्टेंबर २०२२ मध्ये आपली आर्थिक आकडेवारी जाहीर केली, तेव्हा सुमारे १८ महिन्यांच्या सत्य समोर आलं. या आकडेवारीवरून असं दिसून आलं की २०२१ च्या आर्थिक वर्षात बायजूसला ४,५८९ कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. यानंतर बायजूमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अकाउंट्समधील अनियमितता सातत्यानं समोर आल्यानं कंपनीला कर्मचारी कपातीसारखे निर्णय घ्यावे लागले. गुंतवणूकदारांच्या चिंतेनंतर सरकारनं या प्रकरणात हस्तक्षेप केला. केंद्रीय तपास एजन्सी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) कंपनी परिसर तसेच संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या काही ठिकाणांवर छापे टाकले.

टॅग्स :व्यवसाय