मुंबई : गेल्या सहा महिन्यांत चार वेळा टेल स्ट्राइक केल्याप्रकरणी विमानसेवा क्षेत्रात अव्वल कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीला नागरी विमान संचालनालयाने (डीजीसीए) ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी डीजीसीएने कंपनीचे विशेष लेखा परीक्षण केले असून, कंपनीच्या कार्यपद्धतीवरही ठपका ठेवला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या ए-३२१ जातीच्या विमानांचे चार वेगवेगळ्या घटनांमध्ये टेल स्ट्राइक झाल्याचे दिसून आले. यानंतर, डीजीसीएचे मुख्याधिकारी विक्रम देव दत्त यांनी कंपनीच्या विशेष लेखा परीक्षणाचे आदेश दिले होते. या अनुषंगाने कंपनीला एक कारणे दाखवा नोटीसही डीजीसीएने जारी केली होती. मात्र, या नोटिशीला कंपनीने समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे डीजीसीएने म्हटले आहे, तसेच कंपनीचे जे विशेष लेखा परीक्षण झाले, त्यामध्ये कंपनीच्या कंपनीच्या प्रशिक्षणात काही त्रुटी आढळून आल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. कंपनीने आपल्या प्रक्रियेत सुधारणा करून, त्याची आवश्यक कागदपत्रे दंडाच्या रकमेसोबत डीजीसीएकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
टेल स्ट्राइक म्हणजे काय?
विमान उड्डाण करतेवेळी किंवा धावपट्टीवर उतरतेवेळी जर विमानाच्या मागील शेपटीसारखा भाग हा जमिनीला स्पर्श झाला, तर त्याला टेल स्ट्राइक असे म्हणतात. अशा पद्धतीने जर विमानाची शेपटी जमिनीला लागली, तर विमान घसरण्याची भीती असते. त्यामुळे स्वाभाविकच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे विमान क्षेत्रात टेल स्ट्राइक हा अत्यंत गांभीर्याने घेतला जाणारा प्रकार आहे.