अतुल जयस्वाल, अकोलाग्रामीण भागात विद्युत वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यातही राबविली जात आहे. या योजनेंतर्गत महावितरणकडून अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांंमध्ये ग्रामीण भाग भारनियमनमुक्त करण्यासाठी ३० नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांंमध्ये एकूण ३१५.५७ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.सध्या ग्रामीण भागात वाढती ग्राहकसंख्या व आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राज्यात राबविण्याला मान्यता दिली आहे.देशातील सर्व राज्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महावितरणकडून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेमध्ये २२४८ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील विविध परिमंडळांमध्ये फीडरचे विलगीकरण, उच्चदाब व लघुदाब वाहिन्या तसेच वीज उपकेंद्रांची निर्मिती व रोहित्रांचे सक्षमीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये या योजनेंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत.यामध्ये ३० नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, सात ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविणे, ११ पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करणे, १८९३ नवीन रोहित्रे बसविणे, इतर यंत्रणांचे सबलीकरण, मीटर नसलेल्या कृषी ग्राहकांना व इतर नादुरुस्त मीटर बदलविणे यांसारखी एकूण ३१५.५७ कोटी रुपयांची विविध कामे प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
३० नवीन वीज उपकेंदे्र उभारणार...!
By admin | Published: February 05, 2016 3:20 AM