लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२१ च्या पहिल्या नऊ महिन्यांत व्यवहारातील चलनी नोटांत १३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर लोक रोख रक्कम जवळ बाळगण्यास प्राधान्य देत आहेत, त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण वाढले आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ रोजी व्यवहारातील चलनी नोटांचे मूल्य ३,२३,००३ कोटी रुपयांनी अथवा १३.२ टक्क्यांनी वाढून २७,७०,३१५ कोटी रुपये झाले. ३१ मार्च २०२० रोजी २४,४७,३१२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा व्यवहारात होत्या. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये एप्रिल ते डिसेंबर या काळात चलनातील नोटांचे प्रमाण ६ टक्क्यांनी वाढले होते. यंदा ही वाढ दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनीस यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात कठीण प्रसंग उद्भवलाच तर रोख रक्कम हाताशी ठेवण्यास लोकांनी प्राधान्य दिले. त्यामुळे व्यवहारातील चलन वाढले आहे. जेव्हा जेव्हा संकटसदृश स्थिती निर्माण होते, तेव्हा तेव्हा कुटुंबांत रोख रक्कम हाताशी ठेवण्याचा कल निर्माण होतो. त्यामुळे या वित्त वर्षात रोख रकमेची मागणी वाढली आहे. सध्या व्यवहारातील वाढते चलन हे केवळ खबरदारी म्हणून ठेवले गेलेले आहे. इतर कोणतेही कारण त्यामागे नाही.
कोविडमुळे वाढली मागणी
रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०२० मध्ये २०१९-२० या वित्त वर्षाचा वार्षिक अहवाल जारी केला होता. कोविड-१९ साथीमुळे रोख रकमेची अर्थव्यवस्थेतील मागणी वाढत चालल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. कोरोनाची साथ रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊननंतर चलनी नोटांची मागणी वाढत आहे.