Join us

३.३ लाख कोटींचे गृहप्रकल्प रखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 3:58 AM

घरांच्या विक्रीला मंदीने घेरल्यामुळे संपूर्ण भारतात १,६८७ घरबांधणी प्रकल्प रखडले आहेत.

नवी दिल्ली : घरांच्या विक्रीला मंदीने घेरल्यामुळे संपूर्ण भारतात १,६८७ घरबांधणी प्रकल्प रखडले आहेत. ४.६५ लाख घरांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांची किंमत ४७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३.३ लाख कोटी रुपये आहे.‘प्रॉपइक्विटी’ या संस्थेच्या अहवालात ही माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, रखडलेल्या १,६८७ गृहनिर्माण प्रकल्पांत ४,६५,५५५ घरे आहेत. त्यांचे विक्रीयोग्य क्षेत्र ६00 दशलक्ष चौरस फूट आहे. या प्रकल्पांची डिलिव्हरीची मुदत केव्हाच संपली आहे. तरीही ते अपूर्ण आहेत. या प्रकल्पांची सध्याची किंमत ३,३२,८४८ कोटी इतकी आहे. ‘प्रॉपइक्विटी’चे संस्थापक समीर जासुजा म्हणाले, या प्रकल्पांच्या पूर्णत्वातील उशीर २ ते ८ वर्षांचा आहे. हे प्रकल्प केव्हा पूर्ण होतील, याची कोणतीही खात्री देता येत नाही.अनेक ठिकाणी घर खरेदीदार रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत, तर काहींनी न्यायालयाची दारे ठोठावली आहेत.गृहप्रकल्पांतील विलंबामागे अनेक कारणे आहेत. आर्थिक अडचणी, अंमलबजावणीतील आव्हाने, विकासकांनी खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविल्यामुळे घरांची अधिकची उपलब्धता, पर्यावरणविषयक मंजुऱ्यांना होत असलेला विलंब आणि घटलेली विक्री यांचा त्यात समावेश आहे.>मंदीचा प्रभाव कायमसूत्रांनी सांगितले की, देशातील घरबांधणी उद्योगाला अनेक वर्षांपासून मंदीने ग्रासले आहे. ही मंदी अजूनही उठलेली नाही. आणखी किती काळ ती राहील, याबाबतही काहीच खात्रीशीररीत्या सांगितले जाऊ शकत नाही. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पांचे भवितव्य अधांतरीच आहे.

टॅग्स :घर