लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ३३१ संशयित शेल कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सेबीने शेअर बाजारांना दिले आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे समभाग या महिन्यात उपलब्ध नसतील.कंपनी व्यवहार मंत्रालयाने ३३१ संशयित शेल कंपन्यांची एक यादी जारी केली आहे. त्यानुसार सेबीने कारवाईचे आदेश दिले आहेत. या कंपन्यांची नोंदणीही रद्द होऊ शकते. त्यांचे समभाग नजरेखाली ठेवण्यात येतील. गरज भासल्यास स्वतंत्रपणे आॅडिट होईल. कदाचित फोरेन्सिक आॅडिटही केले जाऊ शकते.मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार आणि मेट्रोपोलिटन शेअर बाजार यांना पाठविलेल्या पत्रात सेबीने म्हटले आहे आहे की, ‘या ३३१ कंपन्यांचे समभाग तात्काळ ग्रेडेड सर्व्हेइलन्स मेकॅनिझम (जीएसएम) या यंत्रणेच्या ‘स्टेज फोर’मध्ये ठेवण्यात यावेत.’ समभागांवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. स्टेज फोरमध्ये ठेवलेल्या समभागांना महिन्यातून एकदाच ट्रेड टू ट्रेड श्रेणीत व्यवसायास परवानगी मिळते. त्यामुळे हे समभाग या महिन्यात व्यवसायासाठी उपलब्ध नसतील.सेबीने म्हटले आहे की, या कंपन्यांचे समभाग प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारीच फक्त व्यवसायास खुले असतील. याचाच अर्थ आता या महिन्यात ते व्यवसायासाठी खुले असणार नाहीत. याशिवाय मागच्या सत्रातील किमतीपेक्षा जास्त किमतीत हे समभाग विकण्यावर बंधने येतील. जास्तीच्या रकमेसाठी २०० टक्के शुल्क खरेदीदाराला भरावे लागेल. पाच महिन्यांपर्यंत ही रक्कम शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवील.
३३१ शेल कंपन्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 1:01 AM