लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: देशातील सर्वाधिक मोठी जीवन विमा कंपनी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ अर्थात एलआयसीकडूनकेंद्र सरकारला तब्बल ३,६६२ कोटी रुपयांचा लाभांश यंदा मिळणार आहे. याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एलआयसीचा शुद्ध नफा चौथ्या तिमाहीत २ टक्के वाढून १३,७६३ कोटी रुपये झाला असून कंपनीने प्रतिसमभाग ६ रुपये दराने लाभांश देण्याची घोषणा केली आहे. आजवर एलआयसीकडून देण्यात आलेला हा सर्वाधिक लाभांश आहे. कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रति शेअर ३ रुपये इतक लाभांश दिला होता. एलआयसीमधील सरकारची हिस्सेदारी जवळपास ९६.५ टक्के आहे. त्यामुळे सरकारला ३,६६२ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे. एलआयसीला वित्त वर्ष २०२३ च्या समान तिमाहीत १३,४२८ कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला होता.
किती मिळाला महसूल?
चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल २,५०,९२३ कोटी रुपये राहिला. वित्त वर्ष २०२३ च्या समान तिमाहीत कंपनीचा महसूल २,००,१८५ कोटी रुपये होता. जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक हप्ता १०.७ टक्के वाढून २१,१८० कोटी रुपये राहिला.