नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 4 कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा घोटाळा दिल्लीतल्या एका कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीतून कोट्यवधी रुपये काढण्यात आले आहेत.विशेष म्हणजे हा पैसा देशभरात खासगी क्षेत्रात काम करणा-या हजारो कर्मचा-यांचा आहे. द्वारका सेक्टर -23मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, एफआयआर दाखल झालं आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. तसेच चौकशीसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयातील एका कर्मचा-यालाही ताब्यात घेतलं आहे. या कर्मचा-याकडून घोटाळ्याची व्याप्ती आणि या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास केला जात आहे. या घोटाळ्याची माहिती आर्थिक वर्ष संपण्याच्या दरम्यान समोर आली आहे. ऑनलाइन कॅश ट्रान्झॅक्शनची रक्कम खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेशी मेळ खात नव्हती. काही ट्रान्जेक्शनची माहिती तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागातील वरिष्ठ अधिका-यांनासुद्धा नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.बनावट खात्यांत जमा केली रक्कमकर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दिल्ली-एनसीआरसह पूर्ण देशातील खात्यात हा ऑनलाइन पद्धतीनं घोटाळा झाला आहे. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचं काम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागानं बाहेरच्या कंपनीला दिलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विभागानं ज्या कंपनीला हे काम दिलं, त्या कंपनीनंच हा घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कंपनीच्या कर्मचा-यांनी बनावट खाती उघडून त्यात हा पैसा जमा केल्याचाही पोलिसांना संशय आहे.
ईपीएफओमध्ये 4 कोटींचा घोटाळा, बनावट खाती बनवून गौडबंगाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 11:51 AM