Join us

धक्कादायक! साधूच्या सांगण्यावरुन कर्मचाऱ्याला दिला ४ कोटी पगार; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:27 AM

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांचे कारनामे, भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात ‘सेबी’ने तब्बल ४ ट्रिलियन डॉलरचे बाजार भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे

नवी दिल्ली : शेअर बाजाराचा कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. यावर वरकडी म्हणून सुब्रमण्यम यांचा पगार वार्षिक १५ लाखांवरून तब्बल ४ कोटी २१ लाख रुपये इतका करण्यात आला. यासह अनेक निर्णय चित्रा यांनी केवळ एका साधूच्या सांगण्यावरून घेतले असे सेबीच्या तपासात समोर आले आले आहे. 

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात ‘सेबी’ने तब्बल ४ ट्रिलियन डॉलरचे बाजार भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे. एनएसईच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ चित्रा रामकृष्ण या साधूच्या सांगण्यावरून प्रत्येक निर्णय घेत. हे साधू आतापर्यंत समोर आले नसले तरीही त्याचा प्रत्येक शब्द हा चित्रा यांच्यासाठी प्रमाण होता. साधूच्या सांगण्यावरून राष्ट्रीय शेअर बाजारात निर्णय घेतले जात, असे सेबीने म्हटले आहे. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत एनएसईच्या अध्यक्षा होत्या. त्या साधूला सिरोमणी म्हणत असतं आणि गेली २० वर्षे साधू त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करत होते. सेबीने १९० पानांच्या आदेशामध्ये या अज्ञात  साधूचा २३८ वेळा उल्लेख केला आहे. चित्रा या एनएसईच्या सीईओ म्हणूनही साधूशी संवाद साधत होत्या. 

२०१८ मध्ये सेबीला दिलेल्या माहितीत चित्रा यांनी म्हटले होते की, मी साधू परमहंस या नावाच्या व्यक्तीशी संवाद साधत होती, ते हिमालयात राहतात. हे साधू २० वर्षांपासून संपर्कात असून, त्यांच्यापासून आध्यात्मिक शक्तीचे मार्गदर्शन घेते. यानंतर सेबीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

प्रत्येकी ३ कोटींचा दंडसेबीने चित्रा रामकृष्ण आणि सुब्रमण्यम तसेच एनएसई आणि त्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि इतरांनाही दंडही ठोठावला आहे. सेबीने रामकृष्ण यांना ३ कोटी रुपये, एनएसई, नारायण आणि सुब्रमण्यम यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच सेबीने एनएसईला सहा महिन्यांसाठी कोणताही निर्णय घेण्यास मनाई केली आहे.

टॅग्स :शेअर बाजार