लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०३० पर्यंत देशातील २४ कोटी घरांना ब्रॉडबँडने जोडण्यासाठी ४.२ लाख कोटी रुपयांची गरज आहे, अशी माहिती ईवाय ग्लोबलने दिली आहे.
'ब्रॉडबँड इंडिया फोरम'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 'ईवाय ग्लोबल'चे दूरसंचार प्रमुख तथा भागीदार प्रशांत सिंघल यांनी या कामासाठी किती रुपयांची गरज भासेल याचा आराखडाच सादर केला. सिंघल यांनी सांगितले की, भारतात सध्या ४ कोटी घरे ब्रॉडबँडने जोडलेली आहेत. शहरातील ३.६ कोटी घरांत ब्रॉडबैंड आहे. ग्रामीण भागात मात्र केवळ ३० लाख जोडण्या आहेत. २०३० पर्यंत शहरातील १० कोटी घरांत तर ग्रामीण भागातील १५.३ कोटी घरांत ब्रॉडबँड आवश्यकता आहे.
'ब्रॉडबँड इंडिया फोरम'चे अध्यक्ष टी. व्ही. रामचंद्रन यांनी सांगितले की, देशातील फिक्स्ड ब्रॉडबँडची विद्यमान सुविधा वाढत्या मागणीसोबत ताळमेळ बसविण्यास असमर्थ आहे. आगामी ६ वर्षांत फिक्स्ड ब्रॉडबँड जोडण्यात किमान २० टक्के वार्षिक वृद्धी आवश्यक आहे. अमेरिकेत ९२ टक्के घरांत, चीनमध्ये ९७ टक्के, तर जपानमध्ये ८४ टक्के घरांत ब्रॉडबँड आहे.
कशासाठी किती खर्च येणार?
फायबर अंथरणे - २.७ ते ३ लाख कोटीपायाभूत सुविधा - ९० ते ९६ हजार कोटीवायफाय सुविधा - ६,६०० ते ९,००० कोटीडाटा सेंटर उभारणे - ९,७०० ते १४,१०० कोटीउपग्रह ब्रॉडबँड सेवा - २६,००० ते २९,००० कोटी